सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ओमराजेंच्या तोंडाला शेण फासणार, धाराशिवमधील शिवसैनिक आक्रमक, 'ऑपरेशन टायगर' यशस्वी
  • बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं प्रेम दिलं, त्यांच्यासोबत गद्दारी; संजय राऊतांच्या हल्लाबोल
  • मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
  • ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा तापली; ओमराजे निंबाळकर दिल्लीत गेल्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
  • केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
 जिल्हा

JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    15-06-2026 10:50:22

उरण : जेएनपीटीच्या JSW ऑइल जेट्टीवर आज सकाळी तेलवाहिनी पिगिंगचे काम सुरू असताना BPCL जेटीवर ग्रॅसचा स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. करावली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील रहिवासी राजेंद्र शिंदे, गणेश बेन्झोप्लास्ट कंपनीचे अधिकारी, आणि उरण तालुक्यातील पिरकोन येथील जगन्नाथ गावंड, कंत्राटी कामगार, यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. दोन्ही मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.  
 
घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पिगिंगसारखे अत्यंत धोकादायक काम सुरू असताना GBL कंपनी आणि संबंधित ठेकेदाराने सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नसल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. हेल्मेट, परमिट टू वर्क, सेफ्टी ऑडिट, गॅस टेस्टिंग यासारख्या मूलभूत सुरक्षा उपायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने हा स्फोट झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. "GBL कंपनी आणि ठेकेदाराला कामगारांच्या जीवाची किंमतच नाही. फक्त उत्पादन आणि नफा हेच त्यांचे उद्दिष्ट आहे," अशी टीका संघटनांनी केली आहे.  
 
अपघाताची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांची कारवाई अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचण्याआधीच GBL कंपनी आणि ठेकेदार यांच्यात 'जुळवाजुळव' झाल्याची चर्चा उरणमध्ये सुरू आहे. या प्रकरणात 'सेटलमेंट' करून फाईल बंद केली जाईल की काय, अशी भीती पीडित कुटुंबीय आणि स्थानिक व्यक्त करत आहेत. "दोन जीव गेले तरी GBL कंपनी आणि ठेकेदारावर ठोस कारवाई होत नाही. पोलीस तपास फक्त कागदावरच राहतो का?" असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  
 
जेएनपीटी प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करून दोषी GBL कंपनी आणि ठेकेदाराला वाचवले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेमुळे जेट्टीवरील काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. परंतु, "काम थांबवून काय उपयोग? दोषींवर गुन्हा कधी दाखल होणार आणि शिक्षा कधी मिळणार? पोलीस पुढील तपास करतात की दबावाखाली फाईल बंद करतात, हे आता पाहावे लागेल," अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


 Give Feedback



 जाहिराती