सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन; 'ऑपरेशन टायगर'नंतर पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे आमनेसामने, शक्तिप्रदर्शनाकडे राज्याचे लक्ष
  • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोने 4 हजारांनी तर चांदी तब्बल 18 हजार रुपयांनी स्वस्त
  • तुळजापूरमध्ये 200 आणि 500 रुपये भरून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांचं स्वतंत्र दर्शन बंद; सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शन
 जिल्हा

खुदाचा फरिश्ता ठरला इरफान! विहिरीत उडी घेत 5 जणांचे प्राण वाचवले; सोलापूर दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू

डिजीटल पुणे    15-06-2026 11:09:33

सोलापूर  : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे रविवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा पिकअप टेम्पो रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सात जणांना जीवदान मिळाले. या दुर्घटनेत स्थानिक युवक इरफान मुजावर याने दाखवलेल्या धाडसामुळे पाच जणांचे प्राण वाचले असून परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-सोलापूर महामार्गावरील तांदूळवाडी परिसरात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडला. त्यावेळी टेम्पोच्या मागून दुचाकीवरून येत असलेल्या इरफान मुजावर यांनी प्रसंगावधान राखत तातडीने ग्रामस्थांना मदतीसाठी संपर्क साधला.

दरम्यान, विहिरीत एक चिमुकला बुडत असल्याचे लक्षात येताच इरफान यांनी क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी घेतली. त्यांनी बाळाला सुरक्षित बाहेर काढत प्राथमिक उपचार करून त्याचा जीव वाचवला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आणखी दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांना बाहेर काढण्यात यश आले. दोन जण स्वतः पोहत विहिरीबाहेर आले.

मात्र, टेम्पो विहिरीत उलट्या अवस्थेत अडकल्याने त्यामध्ये अडकलेल्या सात महिला आणि सहा महिन्यांच्या बालकाला वाचवता आले नाही. या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

अपघातातील जखमींना तातडीने पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

धोकादायक विहिरींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रस्त्याच्या कामादरम्यान परिसरातील धोकादायक विहिरी सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची तक्रार त्यांनी केली. संबंधित विहिरीभोवती कोणतेही संरक्षण कठडे नसल्याचेही समोर आले आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले आहे.

धाडसी इरफानचे सर्वत्र कौतुक

स्वतःचा जीव धोक्यात घालून पाच जणांचे प्राण वाचवणाऱ्या इरफान मुजावर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुर्दैवी दुर्घटनेच्या काळोखात इरफान हे अनेकांसाठी देवदूत ठरले असून, त्यांच्या धाडसाची चर्चा संपूर्ण राज्यभर होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती