मुंबई: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिनं आपलं आयुष्य संपवलं आहे. अवघ्या 30व्या वर्षी संचितानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे या घटनेमुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगले आपले आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपाऱ्यातील परिसरात राहत होती. घरी एकटी असतानाच संचितानं टोकाचं पाऊल उचललं. संचितानं राहत्या घरात साडीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
या प्रकरणी आचोले पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून, घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी आढळून आली नसल्याचेही समोर आले आहे.
संचिता उगलेने झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'कुमकुम भाग्य'मध्ये दिया टंडन ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच, 'वागळे की दुनिया'मध्ये रुचिता जेटलीच्या भूमिकेतूनही तिने आपली वेगळी छाप पाडली होती. दंगल टीव्हीच्या 'दिलवाली दुल्हा ले जाएगी' या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती.
छोट्या पडद्याबरोबरच संचिता चित्रपट आणि ओटीटी माध्यमांमध्येही सक्रिय होती. विकी कौशल अभिनित 'छावा' या चित्रपटातही ती झळकली होती. तिच्या अकाली निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास आचोले पोलीस करत आहेत.