सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आई, साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; तुम्हाला सोडणार नाही, खासदारांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिल्याचा संजय राऊतांचा दावा
  • NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी
 शहर

नव्या दुचाकीच्या आनंदावर विरजण! पुण्यात पेढे खाल्ल्याने ७ जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर स्वीट मार्ट सील

डिजीटल पुणे    16-06-2026 11:17:13

पुणे : नवीन दुचाकी खरेदीचा आनंद साजरा करण्यासाठी वाटण्यात आलेले पेढे सात जणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात दोन लहान मुलांसह सात जणांना विषबाधा झाल्याने विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी परिसरातील एका व्यक्तीने नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी स्थानिक मिठाई दुकानातून पेढे खरेदी केले होते. हे पेढे नातेवाईक आणि परिचितांमध्ये वाटण्यात आले. मात्र, पेढे खाल्ल्यानंतर संबंधितांना उलट्या, मळमळ आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती पीडितांच्या नातेवाईक अश्विनी शेवाळे यांनी पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. तक्रार प्राप्त होताच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानंतर FDA च्या पुणे विभागाच्या पथकाने रुग्णालयांना भेट देत माहिती संकलित केली आणि संबंधित मिठाई दुकानावर धाड टाकून पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले.

प्राथमिक तपासानंतर संबंधित मिठाई दुकान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. FDA चे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी सांगितले की, पेढ्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

दरम्यान, चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तपासणी अहवालात निष्काळजीपणा किंवा भेसळ आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती