पुणे : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त प्रभागातील विविध महानगरपालिका शाळांमध्ये "शाळा प्रवेशोत्सव" उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमात हरिदास चरवड यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच पाठ्यपुस्तके व आवश्यक शालेय साहित्याचे वितरण केले.
यावेळी शरदचंद्र पवार ई-लर्निंग स्कूल (वडगाव बुद्रुक), वस्ताद कै. हरिभाऊ पोकळे मनपा शाळा (धायरी), कै. नारायणराव नवले शाळा (वडगाव खुर्द), भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी विद्यालय विद्यानिकेतन क्र. १६ (वडगाव बुद्रुक) तसेच कै. बबनराव नारायणराव जाधव मनपा शाळा क्र. २०३ बी (वडगाव बुद्रुक) या शाळांना भेटी देण्यात आल्या.
हरिदास चरवड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक वर्ष आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सुरू करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक बाबींवर विचारविनिमय करण्यात आला.
शाळांच्या शैक्षणिक, भौतिक आणि प्रशासकीय गरजांचाही आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही हरिदास चरवड यांनी यावेळी दिली.
"शिक्षण हा समाज विकासाचा पाया आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे," असे मत हरिदास चरवड यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे समर्पण आणि पालकांचा सहभाग यामुळे शाळा प्रवेशोत्सव प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. "शिक्षणाची गोडी, प्रगतीची वाटचाल" या संकल्पनेला बळ देत नवीन शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यात आली.