सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
  • युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
  • निम्मा जून संपला तरी मान्सूनची प्रतीक्षा; 24 जूननंतर कोकण-मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
  • मोठी बातमी: अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित!
 DIGITAL PUNE NEWS

मोठी राजकीय घडामोड! शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, ओमराजेंसह 6 खासदार बैठकीत गैरहजर;ठाकरेंचा व्हिप डावलला, बैठकीला केवळ 3 खासदारांची उपस्थिती

डिजीटल पुणे    18-06-2026 12:58:18

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरे गटाने गुरुवारी (18 जून) बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला लोकसभेतील 9 पैकी केवळ 3 खासदार उपस्थित राहिल्याने पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले सहा खासदार बैठकीस गैरहजर राहिल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

बैठकीस अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते, तर ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे हे सहा खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाकडून अनुपस्थित खासदारांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले जाणार आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर पावले उचलली जाऊ शकतात. यासंदर्भातील अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षांकडे राहणार आहे.

दुसरीकडे, हे सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच त्यांचा शिंदे गटाशी संपर्क वाढल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू असून गेल्या काही दिवसांत दिल्लीत घडलेल्या बैठका, संपर्क आणि हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काही दिवसांत या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, व्हीपच्या कायदेशीर वैधतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पक्षांतर्गत बैठकीसाठी जारी करण्यात आलेल्या व्हीपच्या उल्लंघनावरून थेट अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. मात्र पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता या सहा खासदारांची पुढील भूमिका काय असेल, त्यांना स्वतंत्र गटाची मान्यता मिळेल का आणि ठाकरे-शिंदे संघर्षाचा पुढचा अंक लोकसभा अध्यक्षांच्या दालनात कसा रंगेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती