सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 विश्लेषण

युक्रेनचा रशियावर विक्रमी हवाई हल्ला; हजाराहून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा, तेल डेपोचा स्फोट

डिजीटल पुणे    18-06-2026 18:06:01

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धात मोठी घडामोड घडली असून, युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात व्यापक ड्रोन हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, एका रात्रीत 1,000 हून अधिक ड्रोन आणि चार क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. यापैकी सुमारे 200 ड्रोन मॉस्कोकडे येत असल्याचे सांगण्यात आले.

या हल्ल्यात रशियाच्या दक्षिणेकडील रोस्तोव प्रदेशातील एका तेल डेपोला मोठा फटका बसला. स्फोटामुळे डेपोचे मोठे नुकसान झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मॉस्कोतील कपोतन्या तेल शुद्धीकरण प्रकल्पालाही लक्ष्य करण्यात आले. स्फोटानंतर परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले, तर जवळील काही इमारती आणि व्यावसायिक संकुलांनाही नुकसान झाले.हल्ल्यामुळे मॉस्कोतील काही भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अनेक निवासी इमारती रिकाम्या करण्यात आल्या, तसेच राजधानीतील काही विमानतळांवरील उड्डाण सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली.

झेलेन्स्कींचा इशारा : ‘युक्रेन जळाले तर मॉस्कोही जळेल’

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या कारवाईचे समर्थन करताना सांगितले की, हा हल्ला रशियाने अलीकडेच कीववर केलेल्या हल्ल्यांना दिलेले प्रत्युत्तर आहे. रशियाच्या युद्धसामग्रीला मदत करणाऱ्या ठिकाणांवरच लक्ष्य साधल्याचा दावा त्यांनी केला.झेलेन्स्की यांनी रशियाला युद्धाऐवजी राजनैतिक मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करताना, “आम्हाला हे युद्ध नको आहे. मात्र युक्रेन जळाले, तर मॉस्कोही जळेल,” असा इशारा दिला.

राजधानीवर वाढत आहेत ड्रोन हल्ले

2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सुरुवातीला युक्रेनचे हल्ले सीमित स्वरूपाचे होते. मात्र 2023 पासून युक्रेनचे ड्रोन मॉस्कोपर्यंत पोहोचू लागले. आता युक्रेनने लांब पल्ल्याच्या हल्ल्यांची क्षमता वाढवली असून, रशियानेही राजधानीच्या सुरक्षेसाठी मजबूत हवाई संरक्षण व्यवस्था उभारली आहे.युद्धाच्या बदलत्या स्वरूपात दोन्ही देश एकमेकांच्या तेल डेपो, रिफायनरी आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सातत्याने हल्ले करत असल्याने संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.


 Give Feedback



 जाहिराती