सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
  • युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
  • निम्मा जून संपला तरी मान्सूनची प्रतीक्षा; 24 जूननंतर कोकण-मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
  • मोठी बातमी: अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित!
 शहर

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

डिजीटल पुणे    18-06-2026 18:21:47

पुणे : जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या ‘एल निनो‘च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन मा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालक व शेतकरी यांना पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाई व म्हशींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात घट होऊ नये म्हणून पशुपालकांनी पोषक असणाऱ्या चारा पिकांची लागवड करावी. अशी पिके निवडावीत ज्यातून मुख्य शेतमाल (धान्य/उत्पादन) तर मिळेलच, सोबतीला जनावरांच्या पोषणासाठी दर्जेदार चाराही उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर येणारे नैसर्गिक गवत वाया न घालवता त्याचे योग्य जतन करावे. पावसाची ओढ किंवा टंचाईच्या संकट काळात हेच गवत जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आधार ठरणार आहे. भविष्यातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादनावर भर द्यावा. उत्पादित केलेला अतिरिक्त चारा ‘मुरघास’ किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवावा, जेणेकरून जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

पशुसंवर्धन विभागामार्फत ‘एल निनो’च्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पशुपालक-शेतकरी बांधवांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. या संभाव्य संकटकाळात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्षम असून, कोणत्याही शंका तसेच अडचणी संदर्भात पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर नंबरवरुन माहिती व पशुवैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अशी पिके घ्यावीत जी तीव्र टंचाईच्या काळात पशुखाद्य (चारा) म्हणूनही उपयुक्त ठरतील; तसेच चाऱ्याची नासाडी न करता त्याचा प्रभावी वापर व व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर, खरीप आणि रब्बी हंगामातील चारा पिके साठवून ठेवण्यासाठी ‘सायलेज’ (silage) तंत्रज्ञानाचा वापर करावा; जेणेकरून फेब्रुवारी ते जून २०२७ या टंचाईच्या काळात त्याचा वापर करता येईल. एल निनोच्या सावटामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य टंचाईचा फटका आपल्या पशुधनाला बसू नये, ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड व उपलब्ध चाऱ्याची साठवणूक करून आपण पशुधनाचे पोषण आणि आपले आर्थिक उत्पन्न दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो. सर्व पशुपालकांनी या आवाहनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, ही विनंती.


 Give Feedback



 जाहिराती