सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन; 'ऑपरेशन टायगर'नंतर पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे आमनेसामने, शक्तिप्रदर्शनाकडे राज्याचे लक्ष
  • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोने 4 हजारांनी तर चांदी तब्बल 18 हजार रुपयांनी स्वस्त
  • तुळजापूरमध्ये 200 आणि 500 रुपये भरून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांचं स्वतंत्र दर्शन बंद; सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शन
 DIGITAL PUNE NEWS

पक्ष सोडताच ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे नेतृत्वावर निशाणा; उद्धव ठाकरेंची अडचण समजू शकतो, पण आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय राहायला हवे होते

डिजीटल पुणे    19-06-2026 16:01:56

मुंबई : राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदारांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा जोर धरत असताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करताना विशेषतः आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये वावरत आहेत आणि जनतेशी संपर्क ठेवत आहेत. उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे मर्यादा असू शकतात, हे समजू शकते. मात्र, आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रियपणे पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये काम करायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पक्षांतराच्या निर्णयाबाबत बोलताना निंबाळकर यांनी आपण मोठ्या धर्मसंकटात असल्याचे सांगितले. "भावनिकदृष्ट्या हा निर्णय चुकीचा वाटतो, पण राजकीय वास्तवाचा विचार केला तर तो योग्य ठरू शकतो," असे त्यांनी नमूद केले.

ठाकरे गटात राहून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतःची ताकद वाढवणे कठीण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय पाठबळ मिळत नसल्याने लोकांची कामे मार्गी लावण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षांतरासाठी आर्थिक व्यवहार किंवा विशेष सुरक्षा देण्यात आल्याच्या चर्चांचे निंबाळकर यांनी खंडन केले. हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कार्यकर्त्यांशी चर्चा आणि पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील न्यायालयीन निकालानंतरच आपण अंतिम निर्णय जाहीर करू, असे सांगत 20 जूननंतर आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी म्हटले.


 Give Feedback



 जाहिराती