मुंबई : राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर तब्बल 20 वर्षांनंतर निकाल लागला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
3 जून 2006 रोजी धाराशिवचे प्रभावी राजकीय नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे होता. त्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखा आणि पुढे सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला.
निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले की, संपूर्ण खटल्याचा आधार मुख्यत्वे माफीच्या साक्षीदाराच्या जबाबावर होता. मात्र त्या साक्षीदाराने वेळोवेळी वेगवेगळी विधाने केली. त्याच्या कबुलीजबाबात अनेक तफावती आढळून आल्या. तसेच कबुलीजबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेतही अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, तपास यंत्रणेकडून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले नाहीत. आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले नाहीत, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्यात आले नाहीत, तसेच अनेक दाव्यांना स्वतंत्र पुष्टी देणारे पुरावेही सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर पूर्ण विश्वास ठेवणे शक्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले.
साक्षीदाराच्या विविध जबाबांमधील विसंगती, आर्थिक व्यवहारांबाबतची बदलती माहिती, आरोपींशी झालेल्या कथित भेटींबाबतचे विरोधाभासी दावे आणि तपासातील त्रुटी यांचा सविस्तर उल्लेख न्यायालयाने निकालात केला. या सर्व बाबींचा विचार करता आरोपींविरोधात संशयापलीकडे जाऊन गुन्हा सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, सीबीआयने राजकीय वैमनस्यातून 25 लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप केला होता. मात्र उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे हा आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. परिणामी, पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
राज्यातील राजकारणाला हादरा देणाऱ्या या गाजलेल्या हत्याकांडाचा शेवट अखेर न्यायालयीन निर्णयाने झाला असला, तरी तपासातील त्रुटी आणि पुराव्यांच्या अभावामुळे हा निकाल चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.