पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांच्या सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये दिव्य स्पर्श योग सेंटरच्या संचालिका मेघा सोनवणे यांच्या योग व ध्वनी चिकीत्सावरील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
सहभागी शिक्षकांना जागतिक योग दिनाचे महत्व स्पष्ट करताना प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी २०१४ साली संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताने मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता देत २१ जून २०१५ रोजी संपूर्ण जगभरामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला असे नमूद केले. तसेच निरोगी आयुष्य व उत्तम रोगप्रतिकारशक्तीसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत योग दिनाच्या निमित्ताने प्राणायाम व योग केंद्रित स्वस्थ जीवन शैली आत्मसात करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला.
या योग प्रशिक्षण सत्र अंतर्गत मेघा सोनवणे यांनी योग प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करत योग म्हणजे स्वतःच्या अनुभवाचं शास्त्र असे नमूद करत आनंदी जीवनासाठी योगाचे महत्व उपस्थितांसमोर मांडले. त्याच बरोबर ज्ञानयोग, भक्तियोग, एकाग्रता, सूक्ष्म शरीर, नाडी शुद्धी, प्राणायाम इत्यादी घटकावर सविस्तर माहिती देत सुखासन, त्रिकोणासन, पर्वतासन असे विविध आसनांचे प्रकार उपस्थितांकडून करून घेतले. तसेच तणाव मुक्ती व मानसिक शांततेसाठी ध्वनी चिकित्सेचे (साउंड हिलींग) महत्व सांगितले. साऊंड हीलिंगचे उत्तम प्रात्यक्षिक करून वर्कशॉप घेतले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत दररोज प्राणायाम व योग करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाचे संयोजन शारिरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पठारे यांनी केले असून सूत्रसंचालन डॉ. विजय घाडगे व आभार प्रदर्शन डॉ. रमाकांत कस्पटे यांनी केले. छायाचित्रणासाठी प्रणित पावले व यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.