सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष
  • : मोठी बातमी : ओमराजे केस हरताच एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, अमित शाहांसोबत चर्चा, आता वरिष्ठ न्यायालयात जाणार!
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 DIGITAL PUNE NEWS

पवनराजे खटल्याच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकरांचा यू-टर्न?; शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर दिली मोठी प्रतिक्रिया

डिजीटल पुणे    20-06-2026 14:43:27

मुंबई : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा जोर धरत असताना, निकालानंतर त्यांनी या विषयावर सावध भूमिका घेतली आहे. शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ओमराजे म्हणाले की, “माझा राजकीय निर्णय आणि या खटल्याचा निकाल यांचा कोणताही संबंध नाही. मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांचे मत जाणून घेईन आणि त्यानंतर पुढील निर्णय घेईन.” त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटात जाण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील निकालामुळे ओमराजेंना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तब्बल 20 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आलेल्या निकालाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “इतका दीर्घ कालावधी न्यायासाठी खर्च करूनही असा निकाल येणे दुर्दैवी आहे. न्यायालयाने राजकीय वैमनस्य असल्याचे मान्य केले, मात्र सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मग हत्या नेमकी कोणी केली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तपास प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुरुवातीच्या पोलिस तपासावर दबाव असल्याचा आरोप करत त्यांनीच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. आता सीबीआय पुढे कोणती भूमिका घेते आणि वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले जाते का, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली. ओमराजे यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा संघर्ष असल्याचे सांगत त्यांनी पक्षशिस्तीचा मुद्दाही उपस्थित केला. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीकडे ओमराजेंनी पाठ फिरवली होती, त्यामुळे त्यांनी पक्षशिस्त मोडल्याचे देसाई म्हणाले. मात्र, ओमराजे पुन्हा पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेत असल्यास त्याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला असून, ते ठाकरे गटातच राहणार की शिंदे गटाची वाट धरणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती