मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे हिच्या विवाहसोहळ्यापूर्वीच्या कार्यक्रमांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. रेवती सुळे आणि उद्योगपती सारंग लखानी यांच्या संगीत सोहळ्यात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये शाहरुख खान रेवती, सारंग आणि कुटुंबीयांसोबत लोकप्रिय हिंदी गाण्यांवर ठेका धरताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील गाण्यावर त्याने डान्स करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच त्याची प्रसिद्ध सिग्नेचर स्टेपही पाहायला मिळाली. काळ्या रंगाच्या आकर्षक पोशाखात शाहरुखचा लूक चर्चेचा विषय ठरला.
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह २० जून रोजी पार पडला. लग्नाआधी हळद, पूजा आणि संगीत यांसारख्या विविध कार्यक्रमांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले आहेत. या सोहळ्यांना राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावल्याची माहिती समोर आली आहे.
रेवती सुळे या शरद पवार यांच्या नात तसेच सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केले असून बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी आईच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.
दरम्यान, सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. ते बॅडमिंटन क्षेत्राशीही संबंधित असून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे.रेवती-सारंग यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.