पुणे : जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेत विविध आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ‘पौष्टिक खा, निरोगी रहा’ हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी विद्यार्थी आणि त्यांच्या वडिलांनी एकत्रितपणे योगाभ्यास केला. तसेच पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी वडील आणि मुलांनी शिक्षिकांसमवेत सॅलड तयार केले. उत्तम आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि कुटुंबीयांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


योग प्रशिक्षणासाठी ‘स्वास्थ बोध नेचर क्यूअर’ संस्थेच्या माधवी गोखले आणि राजश्री गोडबोले यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आणि आरोग्यदायी सवयींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.या उपक्रमाला विद्यार्थी आणि त्यांच्या वडिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. योग, आरोग्य आणि कुटुंबातील सुसंवाद यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला.
