मुंबई : अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्याला कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली आहे. सध्या त्यांच्यावर किमोथेरपीसह आवश्यक उपचार सुरू असून, उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे त्यांनी चाहत्यांना सांगितले. या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांच्या धैर्याचे कौतुक होत असून, चाहते आणि कलाकारांकडून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मेधा यांनी आपल्या आजारपणाच्या संपूर्ण प्रवासाचा भावनिक अनुभव मांडला आहे. निदान, शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिएशन या कठीण टप्प्यांपेक्षा या काळात मिळालेल्या प्रेम, आधार आणि ईश्वराच्या कृपेमुळे आपण हा संघर्ष पार करू शकलो, असे त्यांनी म्हटले. "मी हा प्रवास कधीच एकटीने केला नाही. प्रत्येक वेळी मी खचले, तेव्हा कोणीतरी माझा हात धरून उभे राहिले," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
यावेळी त्यांनी पती महेश मांजरेकर, मुली, कुटुंबीय, मित्र, डॉक्टर, नर्सेस आणि गुरू यांचे विशेष आभार मानले. उपचारादरम्यान मित्रांनी दिलेली साथ, कुटुंबीयांनी केलेली काळजी आणि प्रत्येक कठीण क्षणी मिळालेला भावनिक आधार यामुळे हा प्रवास अधिक सोपा झाल्याचे त्यांनी सांगितले. "शरणागती म्हणजे पराभव नाही, तर श्रद्धेची सर्वोच्च अवस्था आहे," असेही त्यांनी आपल्या अनुभवातून लिहिले.
मेधा यांच्या पोस्टनंतर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सई मांजरेकर हिनेही आईसाठी भावनिक पोस्ट शेअर केली. उपचारादरम्यानचा आईचा फोटो पोस्ट करत, "Strongest Ever... आई, मला तुझा खूप अभिमान आहे," असे तिने लिहिले. वाढदिवसानिमित्तही सईने आईला शुभेच्छा देताना, "आमच्या आयुष्यात कायम प्रकाश पसरवल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करते," अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
मेधा यांची दुसरी मुलगी गौरी इंगवले हिनेही आईसोबतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही मुलींच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आईप्रती त्यांनी व्यक्त केलेले प्रेम आणि आदर अनेकांच्या मनाला भिडत आहे.
मेधा मांजरेकर यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाने आणि संघर्षमय प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना चाहते आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून केली जात आहे.