नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. आपल्या पत्रात पवार यांनी मोदी यांच्या भाषणाचे कौतुक करताना, ते संपूर्ण जगभरातील मराठी लोकांना भावल्याचे म्हटले आहे.
या पत्राविषयी माहिती देताना नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितले की, साहित्य संमेलनाच्या ठिकाणी तीन महापुरुषांचे पुतळे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांसाठी सरहद संस्थेने प्रस्ताव मांडला आहे, तर काही साहित्यिकांनी पूर्ण आकाराचे अश्वारूढ पुतळे उभारण्याची मागणी केली आहे.
तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकेच्या (NDMC) अखत्यारीत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसविण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळाव्यात, यासाठी पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्ली सरकार आणि NDMC ला निर्देश देण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी परिस्थिती बिघडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीड जिल्ह्यात यापूर्वी कधीही अशा घटना घडल्या नव्हत्या. सर्व समाज एकत्रित राहून जिल्ह्याचा विकास होत होता, मात्र अलीकडच्या घटनांमुळे तेथील शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यापूर्वीही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. हे संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पार पडले. संमेलनाच्या दरम्यान काही राजकीय घडामोडींचीही चर्चा झाली होती. आता शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.