सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

देशाच्या राजकारणामध्ये नवीन चाणक्याचा उदय?

डिजिटल पुणे    11-03-2022 12:48:02

 नुकतेच देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले. यामध्ये पंजाब वगळता बाकी सर्व राज्यांमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले, किंबहुना सर्व राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल एवढे संख्याबळ त्यांना मिळाले. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नगण्य आहे, पूर्वीपासून पंजाबमध्ये भाजप हा अकाली दलाच्या छायेमध्ये वाढला. सध्या अकाली दल जरी वेगळे झाले असले तरी फार पूर्वीपासून दोघांची युती होती. त्यामुळे भाजपला तेथे फार काही हाती लागेल अशी परिस्थिती नव्हती. उरलेल्या राज्यांमध्ये सर्वात कठीण निवडणूक ही गोव्याची होती.      

     गोव्यामध्ये २०१७ मध्ये ४० पैकी १७ जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता आणि भाजप १३ जागांवर होता, मात्र एका रात्री मध्ये ९ इतर उमेदवारांचा पाठिंबा मिळवून केंद्रांत संरक्षण मंत्री असलेल्या मनोहर पर्रीकर यांना पुन्हा गोव्यात भाजपची जागा मजबूत करण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र २०१९ मध्ये पर्रीकर यांच्या मृत्यू नंतर प्रमोद सावंत यांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आली. त्यानंतर गेली ३ वर्षांमध्ये गोव्यामध्ये भाजपचे संघटन काही अपवाद वगळता काही चांगली कामगिरी करण्यात तसे थोडे कमीच पडले होते. त्यानंतर मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचे बंड, तसेच काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादी, आप, शिवसेना आणि अगदी तृणमुल काँग्रेस या सर्वांची आव्हाने समोर होती. या सर्वांमुळे गोव्याची निवडणूक भाजपला कठीण जाणार असे बोलले जात होते. अशातच महाराष्ट्र भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोव्याच्या निवडणुकीसाठी भाजपचा प्रभारी बनवण्यात आले.     

      यापूर्वी त्यांना २०२० मध्ये बिहार निवडणुकीमध्ये देखील तेथील प्रभारीपदाचा कारभार देण्यात आला होता. बिहार मध्ये नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दल या पक्षाबरोबर भाजपची युती आहे. मात्र ज्यावेळपासून नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले त्यावेळ पासून नितीश कुमार आणि भाजप यांचे अंतर्गत गृहयुद्ध सुरु होते. अशातच सर्व पोल्स नितीशकुमार आणि पर्यायाने एन डी ए च्या विरोधात जात होते. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीवेळी तेथील प्रभारीपदाची धुरा देण्यात आली होती. निवडणूक प्रभारी असणाऱ्याचे मुख्य काम हे निवडणुकीमध्ये होणारे बंड शमवणे, सर्व स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ ठेवणे, ज्या पक्षांबरोबर युती आहे त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे, काही धूसफूस झालीच तर मध्यम मार्ग काढणे तसेच विविध ठिकाणचे प्रचार ई. यामध्ये वरील सर्व अडचणींचा सामना करित नितीशकुमार यांना भाजप बरोबर जोडून ठेवणे, तसेच भाजप मधून बाहेर पडल्यास एन डी ए चे आणि पर्यायाने संयुक्त जनता दलाचे किती नुकसान बिहार मध्ये होऊ शकते याची कल्पना देऊन देवेन्द्र फडणवीस यांनी सर्व पोल्स फोल ठरवत १२५ जागी एन डी ए चे उमेदवार निवडून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. यामुळे ही कठीण वाटणारी निवडणूक भाजप आणि एन डी ए ला सोपी करुन दिली होती. या निवडणुकीनंतर नितीशकुमार यांचा देखील भाजप विरोधी सूर बंद करण्याची कामगिरी देवेंद्र फडणवीस यांनी निभावली.

      या सर्व गोष्टींचा अनुभव असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा गोव्याची अवघड निवडणूक लादण्यात आली. आणि निकाल सर्वांसमोर आहेत. जिथे २०१७ मध्ये ४० पैकी भाजपच्या १३ जागा होत्या तिथे यावेळी तब्बल २० जागा निवडून आणून भाजपला एकहाती विजय मिळवून दिला. त्याच बरोबर पारंपारीक सहयोगी पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने देखील निकालादिवशीच त्यांच्या निवडून आलेल्या दोन उमेदवारांचे पाठिंबा पत्र फडणवीस यांना दिले. त्यामुळे फडणवीस यांच्यामुळेच गोव्यामध्ये आता प्रमोद सावंत यांना सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यावेळी शिवसेनेने गोव्यातील निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती, भाजप विरोधी सर्व पक्षांची मोट बांधून महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यासाठी उत्सुक असलेल्या संजय राऊत यांना काँग्रेसने काहीच किंमत दिली नाही आणि सर्व पक्ष स्वतंत्र लढले. निवडणुकीमध्ये मतांची टक्केवारी पाहिली तर ठराविक जागा सोडल्या तर हे विरोधी पक्ष एकत्र जरी लढले असते तरी फार काही प्रभाव टाकू शकले असते असे वाटत नाही. त्यामुळे फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते पद सांभाळत तसेच महाराष्ट्राच्या राजकारण्यांवर विविध आरोपाच्या फैरी झाडत तिकडे गोव्यामध्येही भाजपचा झेंडा फडकवला.

      वास्तविक पाहता महाराष्ट्रमध्ये देखील २०१९ मध्ये सर्वात भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आणण्याचे श्रेय देखील त्यांचेच आहे. महाराष्ट्रामध्ये सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये १०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. जे आज पर्यंत राजकारणात धुरंधर असणाऱ्या राष्ट्रवादीला एकदा देखील जमले नाही. मात्र फक्त भाजपला सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी इतर तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद गेले. मात्र ते त्यांचे अपयश नव्हते. 

      विधानसभेच्या निवडणुकांनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे मुंबई मध्ये आता सत्ताधाऱ्यांना घाम फुटला आहे हे नक्कीच. कारण फडणवीस यांचा आता पर्यंतचा निवडणुकांचा आलेख पाहिला असता तो चढताच असल्याचे दिसून येथे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षे एकहाती सत्ता असणाऱ्या शिवसेनेला नक्कीच जोरदार तयारी करावी लागणार आहे. 

     देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास मर्जीतले आहेत. तसेच त्यांचा एकूण राजकारणाचा अभ्यास व अनुभव पाहता त्यांची पुढे केंद्रामध्ये देखील एका महत्वाच्या पदावर वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्या आधी त्यांना मुंबई व महाराष्ट्रात देखील भाजपची सत्ता आणण्याची कठीण जबाबदारी पुन्हा पेलावी लागणार आहे. या सर्व निवडणुका आणि त्यातील देवेंद्र फडणवीस यांचे यश पाहता भाजप मध्ये आता नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यानंतर एका नव्या दमाच्या चाणक्याचा जन्म झाला आहे असेच म्हणावे लागेल.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती