पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने 'शेअर मार्केट मधील करिअरच्या संधी' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या व्याख्यानाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्याख्याते व पिअरसन शेअर मार्केट ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिनकर चव्हाण, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. क्रांती बोरावके, इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वडशिंगकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
'शेअर मार्केट मधील करिअरच्या संधी' या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना डॉ. दिनकर चव्हाण यांनी शेअर मार्केट मधील विविध घटकांचा आढावा घेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशाप्रकारे करावी, आर्थिक साक्षरता, योग्य माहिती अभावी होणारी फसवणूक आणि शेअर मार्केट मधील नोकरीच्या संधीवर सविस्तर माहिती दिली.आपले अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्यक्ष कौशल्यावर आधारित शिक्षणाची निकड लक्षात घेता या व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल अर्थशास्त्र विभागाचे अभिनंदन केले.महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोहिणी येवले तर आभार प्रदर्शन डॉ. विशाल पावसे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. विक्रम मालतुमकर, डॉ. अमृता इनामदार, डॉ. विठ्ठल नाईकवाडी, डॉ. दिपाली चिंचवडे, प्रा. संतोष सास्तुरकर, डॉ. सुनील वाघ, डॉ. मनीषा त्र्यंबके, डॉ. रश्मी भुयान, डॉ. दत्तात्रय फटांगडे, डॉ. मनीषा खैरे, डॉ. गुंजन गरुड, प्रा. अक्षय कामठे, प्रणित पावले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.