मुंबई – दहीहंडीच्या आनंदोत्सवात मानखुर्दमध्ये एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. दोरी बांधण्याच्या तयारीदरम्यान उंचावरून पडल्यामुळे एका गोविंदाचा जागीच मृत्यू झाला. मानखुर्द येथे दहीहंडी उत्सवाच्या तयारी दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. दोरी बांधताना तोल गेल्यामुळे उंचावरून पडून जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वातावरणात शोककळा पसरली आहे. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
मृत गोविंदाचे नाव जगमोहन शिवकिरण चौधरी (वय ३२) असे आहे. तो बाल गोविंदा पथकाचा सदस्य होता. घटनेदरम्यान तो दहीहंडी लावण्यासाठी दोरी व्यवस्थित करत होता. मात्र अचानक तोल जाऊन तो खाली पडला. पडतानाच त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे सांगितले जात आहे.
हादरलेल्या पथक सदस्यांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सणाच्या दिवशी अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्याने उत्सवाचा आनंद काही क्षणांत शोकात बदलला. घटनेनंतर मानखुर्द परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस तपास सुरु आहे. संबंधित आयोजक आणि सुरक्षा उपाययोजनांबाबतही चौकशी होण्याची शक्यता आहे. या दुर्दैवी घटनेने उत्साहाने साजरा होणारा दहीहंडी उत्सव एका कुटुंबासाठी कायमचा काळा दिवस ठरला आहे. स्थानिकांनी मृत गोविंदाला श्रद्धांजली अर्पण करत, आयोजकांनी अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे.