पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. मोशी कचरा डेपोला लागून असलेली दोन मजली इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत सुमारे १४ ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाली. जेसीबी, क्रेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचरा डेपोच्या परिसरातील माती व भराव खचल्याने इमारतीच्या पायाभूत रचनेवर ताण आला आणि इमारत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुर्घटनेमागील नेमके कारण अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून प्रमुख रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. तसेच पवना आणि इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी पुढील २४ ते ४८ तासांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, जुन्या व धोकादायक इमारतींपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर कचरा डेपोच्या अगदी शेजारी निवासी इमारती उभारण्यास परवानगी कशी देण्यात आली, याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित बांधकामाची परवानगी, सुरक्षिततेचे निकष आणि प्रशासनाच्या देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या आणि दुर्घटनेतील हानीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच परिस्थितीचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.