सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पावसाचा जोर ओसरताच खडकवासला धरणाच्या विसर्गात मोठी कपात; मुठा नदीत आता १८,२७१ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • मोशीत भीषण दुर्घटना! दोन मजली इमारत कोसळली; १४ ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
  • पालखी सोहळा मुक्कामाची तयारी पूर्ण; भवानी पेठ आणि नाना पेठेतील विठ्ठल मंदिरे सज्ज
 शहर

आज पुण्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचेआगमन; वाहतुकीत मोठे बदल, वारकऱ्यांसाठी महापालिकेची भव्य तयारी

डिजिटल पुणे    09-07-2026 12:13:55

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालख्यांचे आज (९ जुलै) पुणे शहरात आगमन होत असून, शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, पुणे पोलिस आणि विविध शासकीय विभागांनी वारकऱ्यांच्या मुक्काम, सुरक्षा, आरोग्य आणि वाहतुकीसाठी व्यापक नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत दिवसभर टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येणार असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पालखी मार्गावरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद राहणार आहे. पहिल्या टप्प्यात पहाटे ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बोपखेल फाटा, कळस, विश्रांतवाडी, फुलेनगर, आळंदी रोड, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी रस्ता, वाकडेवाडी, खडकी आणि पाटील इस्टेट चौक परिसरातील वाहतूक बंद राहील. दुसऱ्या टप्प्यात दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि कर्वे रस्त्यावर वाहतुकीस निर्बंध असतील. त्यानंतर सायंकाळी ५ नंतर छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच मध्यवर्ती पेठ परिसरातील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

दोन दिवस पुण्यात मुक्काम करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महापालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. शहरातील १०१ महापालिका शाळांमध्ये मुक्कामाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, १९५ ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत. यामध्ये सहा अत्याधुनिक जर्मन हँगरचा प्रथमच वापर करण्यात आला असून, पावसाळी वातावरणातही वारकऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर निवारा मिळणार आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ४० ठिकाणी वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष, १८० फिजिओथेरपिस्ट, ४०० वैद्यकीय किट्स आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी १५ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, आपत्कालीन सेवा आणि सुरक्षा यासाठी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

दरम्यान, पालखीच्या पुण्यातील मुक्कामादरम्यान १० जुलै रोजी रात्री ९ वाजता सामुदायिक पसायदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांना ऑनलाइन माध्यमातूनही सहभागी होता येणार असून, प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या भाविकांनाही घरबसल्या या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेता येणार आहे. पुणे शहरात आजपासून दोन दिवस भक्ती, सेवा आणि वारकरी परंपरेचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती