मुंबई : भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती, परोपकारी,समाजसेवक आणि उत्तम व्यक्तिमत्व रतन टाटा यांचे बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी ८६ व्या वर्षी निधन झालं. ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्यानंतर त्यांना मुंबई येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मागे एक प्रेरणादायी जीवनाची कहाणी सोडणाऱ्या रतन टाटा यांचा व्यक्तिगत आयुष्य कसं होतं ? याबद्दल अनेक जणांना माहिती नाही. एवढी मोठी व्यक्ती असून देखील ते अविवाहित होते. त्यांनी लग्न का केलं नाही? असं नेमकं काय घडलं ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला ? चला जाणून घेऊयात…
एका टीव्ही माध्यमाच्या जुन्या इंटरव्यू मध्ये माहिती देताना त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यांनी आपल्या प्रेम कहानी बद्दल खुलासा केला होता. रतन टाटा प्रेमात तर पडले मात्र आजूबाजूची परिस्थिती अशी काही होती की प्रेम करून सुद्धा त्यांना लग्न करता आलं नाही.
अमेरिकेत काम करत होते तेव्हा ते प्रेमात पडले होते
रतन टाटा हे चार वेळा प्रेमात पडले होते. पण त्यांनी कोणासोबतही लग्न केले आहे. आयुष्यभर ते सिंगलच राहिले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रतन टाटा यांनी त्यांच्या अधुऱ्या प्रेम कथेबद्दल सांगितलं होतं. जेव्हा ते अमेरिकेत काम करत होते तेव्हा ते प्रेमात पडले होते. पण त्यादरम्यान त्यांच्या आजींची प्रकृती बिघडली. त्यांची आजी भारतात होती आणि त्यांना रतन टाटा यांना भेटायचे होते. त्यामुळे रतन टाटा यांना भारतात परतावे लागले. त्यावेळी रतन टाटा यांची प्रेयसी देखील भारतात येणार होती आणि त्यानंतर दोघेही लग्न करणार होते. पण त्या काळात भारत-चीन या दोन देशांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे त्यांची प्रेयसी भारतात आलीच नाही. काही काळानंतर तिने अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत लग्न केले.
प्रत्येक वेळी कोणत्या तरी कारणाने लग्न करता आले नाही
बडोदा मॅनेजमेंट असोसिएशन च्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत अनेक वैयक्तिक अनुभव शेअर करताना रतन टाटा यांनी सांगितले होते की, मी आयुष्यात चार वेळा प्रेमात पडलो, पण मी अजूनही सिंगलच आहे. प्रत्येक वेळी कोणत्या तरी कारणाने लग्न करता आले नाही. सिमी ग्रेवालच्या कार्यक्रमामध्ये देखील रतन टाटा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं होतं, कधी कधी मला आयुष्यात एकटं वाटतं आणि वाटतं की, कोणाची तरी सोबत पाहिजे होती. पण नंतर त्यांनी सांगितले की, ते सिंगल आहेत, हे एक प्रकारे चांगले आहे. कारण त्यांना कोणाची चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना कामाकडे अधिक चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित करता येते.
उदार व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख
अतिशय उदार व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे. ते आता ८६ वर्षांचे होते. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. १९९१ ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्या नेतृत्वात टाटा समुहाने व्यवसाय क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेले. रतन टाटा यांचे व्यक्तिमत्त्व हे संपूर्ण जगाला माहित आहे. देशाच्या कोणत्याही बिकट परिस्थितीत ते मदत करायला नेहमी सर्वात पुढे असायचे. एक साधे, थोर आणि उदार व्यक्तीमत्व, आदर्श आणि लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. छोट्या कर्मचाऱ्यांनाही ते आपले कुटुंब मानत होते. आपल्या कर्मचाऱ्यांची ते फार काळजी घेत होते.