मुंबई: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात तुफान भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, मारकडवाडीतील मतदान हे नियमबाह्य नाही, आणि याबाबतची आकडेवारी इलेक्शन कमिशनला सादर केली जाईल.
राज्यात महायुतीला जोरदार बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात आलं नाही. त्यामुळे उबाठा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपावरही मोठा हल्लाबोल केला. भाजपानं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भाडण लावण्याचं काम केलं, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.
भाजपा पक्ष कसा आहे, हे आता कळेल : राज्यात सत्ता स्थापन करण्यास अद्यापही राज्यपालांनी महायुतीला पाचारण केलं नाही. त्यामुळे भाजपानं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भांडण लावण्यात येत आहेत. आता डुप्लिकेट शिवसेनेला हा अवमान रोज सहन करावा लागेल. त्यांना आता भाजपा पक्ष कसा आहे, हे कळेल, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांवर जमावबंदी : मारकडवाडी गावातील नागरिकांनी ईव्हीएम मशीनवर अविश्वास व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली. त्यामुळे मारकडवाडी गावात तणाव निर्माण झाला. या गावात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यावरुनही खासदार संजय राऊत यांनी मोठा हल्लाबोल केला. "लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याऱ्यांविरोधात जमावबंदी लावली जाते. आता गावागावात लोक मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत. निवडणूक आयोगानं यावर भाष्य केलं पाहिजे. हा भाजपाचा अंतर्गत खेळ सुरू आहे. विरोधी पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरू आहे," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.