सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

मोठी बातमी! अमोल किर्तीकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का; लोकसभा निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

डिजिटल पुणे    19-12-2024 17:50:07

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या विजयाला आव्हान देणारी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यातील पराभवाचा मुद्दा प्रचंड गाजला होता. सुरुवातीला किर्तीकरांना जिंकल्याचे घोषित करण्यात आले होते, परंतू नंतर वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. यामुळे किर्तीकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर ठाकरे आणि शिंदे गटात लढत बघायला मिळाली होती. या चुरशीच्या लढतीत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी पराभवाचा धक्का दिला होता. वायकरांनी अवघ्या ४८ मतांनी ही निवडणूक जिंकली होती. ६८१ मतांनी पराभूत असताना ७५ मतांनी आघाडीवर कसे आले, नंतर पोस्टल मतदान मोजण्यात आले. यात ते ४८ मतांनी विजयी झाले, असे मुद्दे मांडण्यात आले होते. या निकालावर अमोल किर्तीकर यांनी आक्षेप घेतला होता.

मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच रवींद्र वायकर यांची खासदारकी रद्द करण्याबाबतची याचिकाही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आता यावर न्यायालयाने निकाल दिला असून कोर्टाने अमोल किर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे अमोल किर्तीकर यांच्यासह उध्दव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे डेंजर झोनमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे.

न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने सुनावणी पूर्ण करून ११ डिसेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. वायकर यांच्या विरोधातील कीर्तीकर यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. वायकर यांच्याकडून ४८ मतांनी पराभूत झालेल्या कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर पारदर्शकतेचा अभाव आणि मतमोजणीत त्रुटी असल्याचा आरोप केला होता. त्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली नसल्याचा दावा केला होता.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी अमोल किर्तीकर ईव्हीएम मतमोजणीत एका मताने आघाडीवर होते. मात्र, पोस्टल मतमोजणीत वायकर यांचा ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना ४,५२,६४४ मते आणि किर्तीकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती