पुणे : कर्वेनगर येथील एका नामांकित शाळेमध्ये सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतीलच नृत्यशिक्षकाने अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला काल अटक केली होती. याप्रकरणांमध्ये आज शाळेचे संचालक यांना देखील अटक करण्यात आली आहे.
कर्वेनगरमधील शाळेमध्ये मुलावर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये आज पोलिसांनी शाळेचे संचालक अन्वित पाठक यांना देखील अटक केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये त्यांना अटक करून शाळेची विनाकारण बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप आज पालकांनी केला. हा प्रकार शाळेनेच उघडीकस आणला असून संबंधित शिक्षकाला निलंबित करून पोलिसांच्या हवाली करण्यात शाळेने महत्वाची भूमिका बजावली असताना देखील विनाकारण शाळेच्या संचालकांचे नाव यामध्ये गोवण्यात आले. शाळेने स्वतःहून काउन्सेलिंग सेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आणला होता, तसेच या प्रकरणाची इत्यंभूत माहिती सर्व पालकांना घटना घडल्याच्या दिवसापासून स्वतःहून दिली होती. प्रकार उघडकीस आणल्यानंतर शाळेनेच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना बोलावले, तरी देखील काही राजकीय व्यक्तींनी केलेल्या आरोपांमधून त्यांची अटक झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या घटनेमध्ये काही राजकीय व्यक्ती विनाकारण हस्तक्षेप आहेत असा पालकांचा आरोप आहे. शाळा २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्यानिमित्त शाळेमध्ये वार्षिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणत साजरा करण्याची तयारी सुरू होती. मात्र तत्पूर्वीच शाळेमध्ये ही घटना घडल्याने शाळेला बदनाम करण्याचे आयते कोलीत काहींना मिळाले असल्याची चर्चा पालकांमध्ये होती.
संचालक अन्वित पाठक यांना अटक झाल्याची बातमी कळताच शाळेतील शेकडो पालक वारजे पोलीस ठाण्यामध्ये जमले होते, त्यानंतर सर्व पालकांनी रात्री उशिरा शाळेमध्ये एकत्र येत शाळा व्यस्थापन व संचालक यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला. यावेळी पालकांनी शांततेमध्ये आपला मोबाईल टॉर्च लावून शाळा व्यवस्थापनाला आपला पाठिंबा दर्शवला. तसेच काही पत्रकारांनी याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे निराशा व्यक्त केली. पालकांच्या शिष्टमंडळाने शहर पोलीस आयुक्तांकडे संचालकंचीदेखील तक्रार केली असल्याची बातमी अनेक न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झाली होती, असे कोणतेच निवेदन आपण दिले नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी पालकांनी दिले.