पुणे : पुण्यातील कर्वेनगर येथील एका नामांकित शाळेमध्ये २ मुलांवर अत्याचार झाल्याचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले होते. या घटनेमध्ये शाळेने पोलिसांना या बाबतची माहिती देऊन या घटनेमध्ये आरोपी असणाऱ्या शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र ही घटना ज्या शाळेने उघडकीस आणली आणि पोलिसांना पाचारण केले त्या शाळेच्या संचालकांनाच पोलीस प्रशासनाकडून जबाबदार धरण्यात आल्याचे दिसले. यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा प्रत्यय येथे पाहायला मिळाला, तसेच मुख्य आरोपीला सोडून संस्था चालकांवर व शाळा प्रशासनावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न काहीजण करत असल्याचे पाहायला मिळाले.
काय आहे नेमके प्रकरण ?
मंगळवारी (दि. १७) पुण्यातील कर्वेनगर भागातील एका नामांकित शाळेतील दोन मुलांवर शाळेतीलच नृत्य प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. शासनाच्या नियमाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलांसाठी ‘गुड टच, बॅड टच’ बाबतचे प्रशिक्षण दिले जाते. लहान मुलांना आपल्या सोबत होत असलेल्या कृत्याबाबत पुसटशीही कल्पना नसते. त्यामुळे अशा घटनांबाबत मुलांना जागृत करण्याचे काम या प्रशिक्षणातून होत असते. याच प्रशिक्षणादरम्यान पीडित मुलांनी त्यांच्यासोबत घडलेली घटना या शिबिरातील शिक्षकांना सांगितली. घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून याबाबतची माहिती शाळेच्या मुख्याध्यापक, संचालक व व्यवस्थापनाला देण्यात आली. शाळा व्यवस्थापनाने संबंधीत मुलांच्या पालकांना व पोलिसांना शाळेमध्ये बोलावून घेतले. घडलेली घटना किती गंभीर आहे तसेच पालक जर घटनेची तक्रार दाखल करण्यास धजावत नसतील तर शाळा याबाबत पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रार दाखल करू शकते असा विश्वास शाळेने पालकांना दिला. त्यामुळे पालकही तक्रार दाखल करण्यास तयार झाले आणि पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. तो पर्यंत संबंधित शिक्षक शाळेच्या आवारातच होता, त्याने शाळेचा परिसर सोडून बाहेर जाऊ नये याबाबतची दक्षता शाळेच्या प्रशासनाने घेतली होती. त्यामुळेच पोलिसांना देखील ताबडतोब कारवाई करत या शिक्षकाला अटक करता आली. या घटनेमध्ये आरोपी शिक्षकावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती शाळेच्या सर्व पालकांना देणे आपली जबाबदारी आहे हे ओळखून शाळेच्या मोबाईल ऍपवरून सर्व पालकांना घडलेली घटना जाहीर करत शाळेची भूमिका स्पष्ट करण्यात आली तसेच पुढील सर्व घटनांचे अपडेट्स पालकांना देण्याचे काम शाळेकडून करण्यात आले जेणेकरून कोणताही गैरसमज पालकांमध्ये पसरू नये.
अचानक संस्थाचालकांना अटक
ही घटना घडल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. १८) काही संघटनांनी व राजकीय नेत्यांनी आंदोलने सुरू केली. शाळेतील पालकही शाळेला भेट देऊन याबाबातची माहिती घेत होते. यामध्ये शाळेचे संचालक सर्व पालकांशी भेटून त्यांना घटनेबाबत माहिती देत होते तसेच अशा घटना घडू नयेत यासाठी आणखीन खबरदारी शाळा प्रशासन कशी घेऊ शकते याबाबतचे मुद्दे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र याबाबत आंदोलनकर्त्यांचे शंका निरसन न झाल्याने त्यांनी आंदोलन तीव्र केले. आंदोलनकर्त्यांनी याबाबत शाळेचे संचालक यांना देखील अटक झाली पाहिजे असा पवित्रा घेतला. याबाबतची मागणीदेखील त्यांनी पोलिसांकडे केली. यामागणीची दखल घेऊन पोलिसांनी गुरुवारी (दि. १९) रोजी सायंकाळी संस्थेच्या संचालकांनीही अटक केली. यासर्व घटनेमध्ये पोलिसांना माहिती देण्याचे काम करणाऱ्या संस्था चालकांनाच अटक केल्यामुळे पालकांच्यामध्ये आश्चर्याची भावना होती. एखाद्या हवालदाराने जर कोणता गुन्हा केला तर पोलीस आयुक्तांनाही(कमिश्नर) अटक करतात का? किंवा एका आमदाराने काही चुकीचे केले तर मुख्यमंत्र्यांना अटक करतात का? असा संतप्त सवाल काही पालकांनी केला.
प्रसारमाध्यमांकडून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध, पालकांच्यात रोष
या घटनेमध्ये घडलेल्या काही प्रसारमाध्यमांनी कोणतीही माहिती न घेता दुसऱ्यादिवशी शाळेने "शाळा बंद असल्याचे जाहीर केले आहे, संस्थाचालकांचा देखील यामध्ये सहभाग होता, शाळेने योग्य ती काळजी घेतली नाही, शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी पोलीस आयुक्तांकडे केली" अशा उलट आशयाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. या बातम्या पालकांपर्यंत पोहोचताच पालकांच्यात एकच रोष निर्माण झाला, जी घटना शाळेनेच उघडकीस आणली त्यात शाळेलाच कसे जबाबदार धरले जाऊ शकते असा सवाल पालकांकडून करण्यात आला. संस्थाचालकांना अटक होताच पालकांनी तत्काळ सोशलमीडियावर आवाहन करत वारजे पोलीस स्टेशन येथे जमण्याचा व शाळेला समर्थन दर्शवण्याचा निर्णय घेतला. या आवाहनाला प्रतिसाद देत गुरूवारी रात्री उशिरा शेकडो पालकांनी वारजे पोलिस ठाण्याच्या आवारात जमण्यास सुरुवात केली. पण तेथील अपुरी जागा व वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याच्या शक्यतेने सर्वांना शाळेच्या आवारातच जमण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या आवारात जमून सर्व पालकांनी आपण शाळेच्या सोबतच असून या मध्ये संस्थाचालकांची अटक चुकीची आहे अशी भूमिका मांडली. यावेळी स्थानिक नगरसेवक देखील शाळेच्या बाजूने उभे राहिल्याचे पहायला मिळाले. तसेच प्रसारमाध्यमांनाही आवाहन करत चुकीच्या बातम्या न पसरवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच शाळा कोणत्याही स्वरूपात बंद न ठेवता आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.
दुसऱ्यादिवशी (दि. २०) सकाळी देखील अनेक पालक शाळेच्या समर्थनार्थ हातामध्ये बॅनर्स घेऊन शाळेच्या आवारात जमल्याचे पाहायला मिळाले. एकंदरच या घटनेमध्ये शाळेला बदनाम करण्याचे तसेच मुख्य आरोपी सोडून शाळेलाच जबाबदार धरण्यासाठी शाळेशी ज्यांचा काहीच संबंध नाही अशी मंडळी करत असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला. शाळेच्या आवारात जमलेल्या पत्रकारांनाही अनेक पालकांनी खडे बोल सुनावत मुलांच्या भविष्याचा विचार करण्याचा सल्ला दिला.
शाळेतील लहान मुलांवर परिणाम
या घटनेमध्ये मुख्य घटना व मुख्य आरोपी यांना सोडून शाळेचे नाव बदनाम होत असल्यामुळे त्याचा परिणाम शाळेतील मुलांवर होत असल्याचे दिसून आले. शाळा २५ व्या वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे शाळेने यावर्षीचा वार्षिक महोत्सव अतिशय धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी शाळेतील मुलेही उत्साही होती. मुलांनी २ महिन्यापासूनच त्याची तयारी सुरू केली होती. मात्र अचानक ही घटना घडल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली व शाळेने आपला वार्षिक मोहोत्सव पुढे ढकलल्याचे जाहीर केले. त्यामुळे मुलांच्या उत्साहावर विरजण पडले. या घटनेबाबत मुले पालकांना उलटसुलट प्रश्न विचारत आहेत मात्र पालकही त्यांना योग्य उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करीत असल्याचे पाहायला मिळाले, जेणेकरून त्यांच्या गैरसमज उत्पन्न होऊ नये. मात्र या सर्व गोंधळामुळे १० वीच्या मुलांच्या अभ्यासावर देखील परिणाम होत असल्याने पालक चिंतेत आहेत.