आंध्र प्रदेश : तिरुपतीला जावून बालाजींचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपतीला जावून बालाजींचं दर्शनही घेतात. तिरुपतीचं बालाजींचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे. पण याच मंदिरात आज अतिशय हृदय हेलावणारी घटना घडली आहे.आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात बालाजींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसोबत एक मोठी दुर्घटना घडली आहे. वैकुंठद्वार दर्शनासाठी पास घेण्याच्या रांगेत झालेल्या चेंगराचेंगरीत ४ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. तसेच, भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैरागी पट्टीडा पार्क येथे वैकुंठद्वार दर्शनाचे पास मिळवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. सकाळपासूनच चार हजारांहून अधिक भाविक विविध पास केंद्रांवर रांगेत उभे होते. याचवेळी, गर्दीत अचानक चेंगराचेंगरी होऊन काही भाविक जखमी झाले. तर चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुढे या घटनेची माहिती मिळताच तिरुपती पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेनंतर मंदिर समितीने बैठक बोलावली आणि चेअरमन बीआर नायडू यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेचा आढावा घेण्यात सांगितले. परंतु या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून पुढील सुरक्षा उपायांबाबत चर्चा सुरू आहे.