पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक असणार आहे. जे प्रवासी मुंबई-पुणे असा प्रवास करत असतील , त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुलाचे गर्डर्स बसविण्यासाठी तीन दिवस वाहतूक ब्लॉक करण्यात येणार आहे. जर तुम्ही मुंबई आणि पुण्याला जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 22 ते 24 जानेवारी दरम्यान, दुपारी 12 ते 3 या वेळेत एक्सप्रेसवेवर ब्लॉक केले जाणार आहे. तर चला या बातमीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
पुलाचे गर्डर बसवण्याचे काम सुरू –
मुंबई लेनवर लोणावळा येथील डोंगरगाव/कुसगांव भागात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पुलाचे गर्डर बसवण्याचे काम सुरू होणार आहे. या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. ब्लॉक कालावधीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक जुना पुणे-मुंबई महामार्ग व देहूरोड मार्गे वळवली जाणार आहे. तरी सर्व प्रवाशांनी याची माहिती घेऊनच प्रवास करायचा आहे.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे पुलाचे गर्डर्स बसवले जाणार आहेत. या कामासाठी तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक असल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही महामार्गाच्या किमी क्र. 4/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येईल. तिन्हीही दिवशी दुपारी ३ नंतर मुंबईकडून पुण्याला जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गावरुन सुरू राहील.
द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ट्रॉफिक ब्लॉकच्या अनुषंगाने प्रवासाचे नियोजन करावे अशी विनंती महामंडळाने केली आहे. तसेच या कालावधीत चालकांना काही अडचण आल्यास मदतीसाठी द्रुतगती महामार्गाचा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रं. 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा दूरध्वनी क्र. 9833498334 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे.