सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई, तीन दुकाने सील

डिजिटल पुणे    15-03-2025 15:23:26

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त शिर्डीत दाखल होत असतात. श्रद्धेने हे भक्त साई चरणी हार व प्रसाद अर्पण करतात. मात्र, काही दुकानदार या श्रद्धेचा गैरफायदा घेत असून मूळ किमतीच्या दहापट अधिक किमतीत प्रसाद विकत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, लुट करणाऱ्या दुकानांवर जाऊन त्यांना जाब विचारला आणि नगरपालिकेच्या सहकार्याने ही दुकाने सील केली.

शिर्डीत फुलांचा हार विकण्यास परवानगी नसतानाही त्याची विक्री होत असल्याचे दिसून आले. तसेच, प्रसादाच्या पाकिटांवर कोणतेही विक्री मूल्य न लिहिल्यामुळे भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे उघड झाले. भाविकांच्या तक्रारीनंतर संबंधित दुकानदारांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येत्या रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थानच्या अधिकाऱ्यांची बैठक साई मंदिर परिसरात पार पडली. या वेळी नागपूर येथून आलेल्या एका गरीब कुटुंबाची २०० रुपयांच्या हार प्रसादासाठी ९०० रुपये वसूल करून लूट झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दुकानांवर धडक मारली आणि नगरपालिकेच्या मदतीने ते दुकान सील केले. चौकशीत आणखी काही भाविकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. परिणामी, तीन दुकाने सील करण्यात आली असून, संबंधित दुकानदार आणि भाविकांना दुकानांकडे नेणाऱ्या पॉलिशी एजंटांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिर्डीतील काही हार व प्रसाद विक्रेते आणि एजंट भाविकांची लूट करत असल्याने ग्रामस्थांनी इतर दुकानदारांना यापुढे अशा प्रकारावर कठोर कारवाई होईल, असा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे भाविकांची होणारी लूट थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती