सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीत मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, ही आहेत मंदिराची खास वैशिष्ट्ये

डिजिटल पुणे    17-03-2025 14:44:14

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचं उद्घाटन सोमवारी पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा या शिवमंदिराच्या माध्यमातून शिवप्रेमींना पाहायला मिळेल असं सांगितलं जात आहे. एखाद्या किल्ल्याप्रमाणेच रचना असणाऱ्या या मंदिराला शिवप्रेमींनी भेट द्यावी, असं आवाहन व्यवस्थापन समितीकडून करण्यात आलं आहे. या मंदिराला तात्काळ तीर्थस्थळाचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

आज भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या पहिल्या शिवमंदिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले आहे. या भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ऐतिहासिक किल्ल्याच्या धर्तीवर साकारलेल्या या मंदिरामुळे शिवप्रेमींना महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्याने अनुभवता येणार आहे.

शिवमंदिराची वैशिष्ट्ये

अडीच हजार चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेल्या या भव्य मंदिराची रचना गडकिल्ल्यांच्या स्थापत्यशैलीवर आधारित आहे. मंदिराभोवती सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळाची तटबंदी असून, त्यामध्ये मजबूत बुरूज, महाद्वार आणि टेहळणी मार्गांची रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यावर ४२ फूट उंचीचे सभामंडप असून त्याभोवती गोलाकार बुरूज आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंचीही ४२ फूट इतकी असून, संपूर्ण बांधकाम दगडी वास्तुशैलीत करण्यात आले आहे.

या मंदिरातील प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली साडेसहा फूट उंचीची भव्य छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तसेच मंदिराच्या प्रत्येक खांबांवर कोरीव नक्षीकाम असून, महिरपी कमानींनी या वास्तुशिल्पाला देखणे सौंदर्य प्राप्त झाले आहे.

इतिहासाचे जिवंत दर्शन

या मंदिराच्या तटबंदीच्या आत ३६ वेगवेगळे विभाग आहे. त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे चित्रण करणारी भव्य शिल्पे साकारण्यात आली आहेत. शिवरायांचा जन्म, अफजलखान वध, राज्याभिषेक, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला हा प्रसंग अशा ऐतिहासिक घटनांचे दर्शन येथे पाहिला मिळणार आहे.

उभारणीसाठी मोठा आर्थिक निधी

महत्वाचे म्हणजे, या मंदिराच्या उभारणीसाठी ७ ते ८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. ह. भ. प. डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी या मंदिराची संकल्पना साकारली.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य उभारण्यातले योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले की, “महाराजांनी देव, देश आणि धर्म रक्षणासाठी आयुष्य वेचले. आज आपण मंदिरांमध्ये जाऊ शकतो, साधना करू शकतो, हे त्यांच्याच पराक्रमामुळे शक्य झाले आहे. जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही, तसंच शिवरायांचे दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही देवाचं दर्शन फळणारे नाही.”

त्याचबरोबर, “छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीही इथे आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ माँसाहेबही इथे आहेत. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं राष्ट्रमंदिर आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती