सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

चौदा ब्रह्मांचे वर्णन (भाग २)

डिजिटल पुणे    10-06-2024 10:23:16

चौदा ब्रह्मांचे वर्णन (भाग २)

मागील लेखापासून पुढे ....

निर्गुण ऐसे जे नाव | त्या नावास कैचा ठाव | गुणेविण गौरव | येईल कैचे ||७/३/३५||

९.जेथे गुणांना स्थान नाही ते निर्गुण ब्रह्म होय. जेथे गुण नाहीत तेथे शब्द पोहोचू शकत नाही. निर्गुण हाही एक शब्दच आहे. त्याने कोणती वस्तू दर्शवली जात नाही. गुणच नाही तर वस्तू नाही व वस्तू नाही तर वर्णन कोणाचे करायचे ? माया मृगजळ आहे, दृश्य विश्व कधीच निर्माण न झालेले स्वप्न आहे, कल्पना आहे. जेथे गुणमय दृश्य विश्व मृगजळासारखे आहे, त्याचे अस्तित्व नाही तेथे त्या गुणांना ओलांडून राहणारे निर्गुण ब्रह्म खरे मानता येणार नाही. सगुण ब्रह्म हीच मुळी कल्पना आहे म्हणून निर्गुण ब्रह्म हे देखील आपलीच कल्पना आहे. ब्रह्म हे सगुण वा निर्गुण असे दोन्ही नाही. द्वैताच्या कल्पना अद्वैताचे वर्णन करण्यासाठी आपण वापरतो.  त्यामुळे सद्वस्तु जशी आहे तशी ग्रहण होऊ शकत नाही. मायेच्या पसाऱ्यात सत्ता वावरते. पदार्थांच्या पसाऱ्यात जाणतेपण वावरते. अविद्येच्या पसाऱ्यात चितशक्तीचा खेळ चालतो. सत्ता, साक्षित्व आणि चितशक्ती या कल्पना माया, दृश्यपदार्थ आणि अज्ञान यामधून निर्माण होतात. या तीनही गोष्टी गुणांच्या कक्षेतील आहेत. ज्या स्वरूपाला गुणांचा संपर्क नाही तेथे या कल्पना लटक्या पडतात. असे जे गुणरहित परब्रह्म ते निर्गुण या शब्दाच्या संकेताने सांगावे लागते. अर्थात हा शब्द व तो संकेत दोन्ही अशाश्वत आहेत.

१०.वाणीने ज्याचे वर्णन केले जाते ते वाच्यब्रह्म होय.

११.केवळ अनुभवाने जाणता येते असे शब्दाच्या पल्याड असलेले असे अनुभवगम्य असलेले अनुभवब्रह्म होय. अनुभव विषय, अनुभव घेणारा मी आणि अनुभूति अशी त्रिपुटी इथे असते.

१२.आनंदाचा अनुभव घेणारी वृत्ती तेथे असते ते आनंदब्रह्म होय. अनुभव ब्रह्म व आनंद ब्रह्म दोन्ही माणसाच्या वृत्तीचे व्यापार असतात. आणि वृत्तीबरोबर नाश पावतात.

१३.ब्रह्माशी तदाकार होऊन अभेद घडतो ते तदाकारब्रह्म होय. तिथे वृत्ती राहू शकत नाही. अविद्या असे पर्यंत वृत्ती असतात अभ्यासाने ती वृत्ती तदाकार होते. अविद्या संपूर्ण नाहीशी होईपर्यंत वृत्ती पुन्हा खाली येते. ज्ञानी पुरुषात देखील पायऱ्या असतात म्हणून तदाकार ब्रह्म देखील परब्रह्म नव्हे.

१४.वाणी आणि मन जिथून माघारी फिरते, म्हणजे ज्याची व्याख्या करता येत नाही ते अनिर्वाच्यब्रह्म होय. अनिर्वाच्य ब्रह्म हा वृत्तीच्या अनुरोधाने खूण म्हणून तो शब्द वापरतात. आपल्याला जे ज्ञान होते ते वृत्तिरूप असते. असे वृत्ती प्रधान ज्ञान अर्थरूप असल्याने कमी जास्त प्रमाणात शब्दांनी बोलता येते. ते वाच्य असते. अर्थात ब्रह्माशी तदाकारता झाल्यानंतर वृत्ती राहत नाही. जेथे वृत्तीच नाही तिथे वाच्यता देखील नाही. जे वाच्य नाही ते अनिर्वाच्य होय. वृत्तीच्या संबंधानेच अनिर्वाच्य शब्द योजला जातो. म्हणून ब्रह्म अनिर्वाच्य आहे हे म्हणणे अयोग्य आहे.

अशी ही चौदा ब्रह्मे समर्थांनी या समासात सांगितलेली आहेत.

शुद्ध ब्रह्म शाश्वत आणि माया अत्यंत अशाश्वत आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मन वृत्तीमय आहे. ते निवृत्त झाले की त्यास उन्मनी स्थिती म्हणतात. ती शब्दाच्या पल्याड आहे. इथे बंधन, मर्यादा, भेद, वेगळेपणा नाही. या उन्मनी स्थितीत योग्यांची खरी विश्रांती आहे. अशा प्रकारे उपाधिशून्य सद्वस्तु स्वत: बनणे म्हणजे सहजसमाधी होय. इथे जीव दु:खमुक्त होतो. या उपाधींचा शेवट म्हणजेच ब्रह्म साक्षात्कार होय. पूर्व पक्ष म्हणजे शंका उपस्थित करणे आणि त्यांचे निरसन म्हणजे उत्तरपक्ष. तो करून सिद्ध होणारे निश्चित तत्त्व आत्माच आहे. हे सर्व वेदांत ग्रथांचे प्रमेय आहे.

अशाप्रकारे शाश्वत ब्रह्माच्या ठिकाणी भ्रम, दृश्याचा स्पर्श, कल्पना नाही. स्वस्वरूपाच्या अनुभवाने देहबुद्धी नष्ट होते आणि सगळीकडे ब्रह्मस्वरूप अनुभवाला येते. देहबुद्धीची कल्पना नाहीशी करण्यासाठी निर्विकल्प ब्रह्माची कल्पना करावी. यामुळे आपण निर्विकल्प झाल्यावर आपण आत्मस्वरूपाने अनंत होऊन राहतो. कल्पनेला स्वरूपाकडे वळवावे. यामुळे ती स्वरूपाशी तदाकार होईल आणि निर्विकल्पता येईल. अर्थात निर्विकल्प कल्पनारहित असल्याने त्याची कल्पना करू गेल्यास स्वत: कल्पनाच निर्विकल्प बनते. परब्रह्म हे दृश्य पदार्थासारखे नाही की हातात देता येते. सद्गुरू मुखाने ब्रह्मस्वरूप श्रवण करून त्याचा अनुभव घेता येतो.

संशोधक, लेखक, कथाव्यास - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती