सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

शुद्ध व शाश्वत ब्रह्म स्वरूप (भाग २)

डिजिटल पुणे    24-06-2024 10:14:59

शुद्ध व शाश्वत ब्रह्म स्वरूप (भाग २)
 
मागील लेखापासून पुढे ...
 
सोने व पितळ दोन्ही पिवळे असते पण पितळात काळसरपणा असतो. तो नसेल तर त्याला सोनेच म्हणावे. तसे आकाश अत्यंत सूक्ष्म व विशाल आहे. ब्रह्मही तसे आहे. पण आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे तसे ब्रह्माच्या ठिकाणी नाही. तो शून्यपणा आकाशाच्या ठिकाणी नसता तर ते ब्रह्मस्वरूप असते. ब्रह्म आकाशासारखे आणि ब्रह्मशक्ती म्हणजे माया वायूसारखी आहे. वायू असतो पण प्रत्यक्ष दिसत नाही. तसे मायेचा अनुभव येतो पण ती दिसत नाही.
 
माणसे शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होतात पण ते शब्द विरून जातात. शब्द अशाश्वत असतात, अस्थिर वायुसारखी शब्दसृष्टी असते. माया देखील अस्थिर, अशाश्वत आहे. ब्रह्म तेवढे शाश्वत आहे. ब्रह्म सर्वांना व्यापून आहे. जड पृथ्वीला ते व्यापलेले आहे तरी ते जड नाही. ते इतके सूक्ष्म आहे की त्याच्या इतके कोणी सूक्ष्म नाही. पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म आहे, पाण्यापेक्षा तेज सूक्ष्म आहे, तेजापेक्षा वायू आणि वायू पेक्षा आकाश सूक्ष्म आहे. ब्रह्म आकाशाहून सूक्ष्म आहे.
 
ब्रह्माचा अनुभव होण्यासाठी साधकाला किती सूक्ष्म व्हावे लागेल ! तेवढे सूक्ष्म झाल्यावरच ब्रह्म कसे निर्लेपपणाने विश्वास व्यापून आहे हे उमजेल. श्रीसमर्थ सांगत आहेत की पृथ्वीला व्यापून असलेले ब्रह्म पृथ्वी नष्ट झाली तरी नष्ट होत नाही. ते पाण्यात व्यापलेले आहे पण पाणी शोषले गेले तरी ते शोषले जात नाही. ते तेजाला व्यापून आहे तरी तेजाने म्हणजे अग्नीने जळत नाही. वायुला व्यापून असले तरी वायूप्रमाणे चळत नाही. ते आकाशाला व्यापून असले तरी ते आपल्याला कळत नाही. आपल्या शरीरालाही ते व्यापून आहे तरी ते कसे व्यापून आहे हे आपल्याला कळत नाही. इतके निकट आहे म्हणून दूर असल्यासारखे आहे. किती नवलाची ही गोष्ट आहे !
 
अवकाशातील सगळे दृश्य विश्व विलीन झाल्यावर जे केवळ आकाश उरते तसे ब्रह्म समजावे. आपण ठेवलेले द्रव्य काही काळाने आपल्यालाच दिसत नाही तसे ब्रह्माबाबतीत घडते. दृश्यपणाने असणे म्हणजे खरे असणे होय अशी आपली दृष्टी असते. पण खरे असणे सूक्ष्म आहे असे समजून ज्याला अदृष्यात शिरण्याची कला साधली त्यालाच सगळीकडे ब्रह्म अनुभव येतो. स्थूल दृष्टीला असा अनुभव येत नाही. नामरूपात्मक असे हे विश्व तात्पुरता भ्रम आहे. त्या पलीकडचे ब्रह्म साक्षात्कारी पुरुष जाणतात. आकाशातील धुराचे डोंगर तात्पुरते असतात तसे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी मायेच्या करामतीने विश्वाचे अवडंबर दिसते अर्थात ते मिथ्या आहे.
 
सूक्ष्मपणे डोळ्यात राहून तेच वाचन करते. कानाने तेच ऐकून घेते, मनाने विचार तेच करते. पायांनी चालताना तेच शरीराला व्यापून असते. हातांनी वस्तू घेताना तेच वस्तूला व्यापते. त्या ब्रह्मामध्येच सर्व इंद्रिये काम करत असतात. तरी इंद्रियांनी ते जाणता येत नाही. प्रथम मनातून हे सर्व दृश्य विश्व नाहीसे झाले पाहिजे. देहासकट सर्व दृश्य सृष्टी सत्य नाही अशी खात्री झाली म्हणजे ब्रह्म अनुभव घेण्याची पात्रता येते. जीव ब्रह्म स्वरूप होऊन जातो. ही ज्ञानदृष्टी अत्यंत सूक्ष्म असते. तर इंद्रियदृष्टी स्थूल असते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अज्ञान वृत्तीच्या पल्याड असलेली तुर्या ही ज्ञान (सर्वसाक्षिणी) अवस्था आहे. तिला एकीकडे ब्रह्माचे भान आहे तर दुसरीकडे विश्वाचे भान असते. स्वरुपानुभव येण्यासाठी वृत्ती कुठे ठेवावी हे तुर्येत कळते. मी आत्मा सर्व दृश्याच्या अतीत आहे, मी त्याचा केवळ साक्षी आहे !
 
साक्षत्व वृत्तीचे कारण | उन्मनी ते निवृत्ति जाण | जेथे विरे जाणपण | विज्ञान ते ||७/४/५०||
 
अशी अवस्था तुर्येत असली तरी तिच्यामध्ये साक्षित्वाची सूक्ष्म वृत्ति असते. ती वृत्ती मावळली की उन्मनी स्थिती येते. संपूर्ण वृत्तीरहित अशी अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था होय. त्या निवृत्ती अवस्थेमध्ये सर्व जाणतेपण विरते तेच विज्ञान होय. अशाप्रकारे मी देह आहे हे अज्ञान नाहीसे होऊन मी आत्मा आहे असे ज्ञान होते. ज्यास तुर्या म्हटले गेले आहे. पुढे ते ज्ञानही नाहीसे होऊन विज्ञान येते म्हणजे उन्मनी स्थिती येते. हे विज्ञानदेखील परब्रम्हात जिरते. मग केवळ शुद्ध, विमल ब्रह्म शिल्लक राहते. जिथे सर्व कल्पना नाहीशा होतात. हाच योगी लोकांचा एकांत आहे.
 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती