श्रवण निरुपण (भाग ४)
बहुत प्रकारे पाहाता | ग्रंथ नाही अद्वैतापरता | परमार्थास तत्वता | तारूच की ||७/९/२८||
अनेक अंगांनी विचार केल्यावर अद्वैत विचार सांगणाऱ्या ग्रंथासाराखा दुसरा ग्रंथ नाही. होडीप्रमाणे तो साधकाला तारतो.
श्रीसमर्थ काय ऐकावे, काय वाचावे याचे मार्गदर्शन करत आहेत. ग्रंथ वाचतो याचा अर्थ तो ग्रंथ वाचकाबरोबर संवाद करत असतो. आणि आतल्याआत वाचक तो ग्रंथ ऐकतच असतो. ग्रंथी (अज्ञान गाठी) नष्ट करतो तो ग्रंथ. जसे वाचन वा श्रवण आहे तसे चित्त घडत जाते. हास्य-विनोद-नवरस व्यक्त करणारे अनेक ग्रंथ आहेत पण ज्याला अज्ञान नष्ट करायचे आहे त्याच्यासाठी ते कामाचे नाहीत. अशी पुस्तके भावनांच्या संमोहनात वाचकाला ठेवतात. संसारात बद्ध करतात. पण ज्याने मन शुद्ध होऊन परमार्थ घडतो, अनुताप वाढतो, भक्तीसाधनाची आवड उत्पन्न होते तोच खरा ग्रंथ होय. ज्याने अभिमान नाहीसा होतो, भ्रम मिटतो, विरक्ति बळावते, दोष दूर होतात, अधोगती टळते, अंगी धैर्य उत्पन्न होते, परोपकार करावा वाटतो, विषयवासना मोडून जाते, परमार्थसाधना समजते, जे वाचून आत्मज्ञान होते तोच ग्रंथ होय.
जगात पुष्कळ ग्रंथ कर्मकांड, व्रतवैकल्ये व त्यांची फळे सांगतात. पण ज्याने विरक्ति वाढून भक्ति उत्पन्न होत नाही त्यास ग्रंथ म्हणता येणार नाही. सकाम कर्मे आणि त्यांची फळे सांगणारे ग्रंथ मनात संसाराची अशुभ वासना उत्पन्न करतात. अशा ग्रंथाने विवेक व परमार्थ न वाढता अधोगतीच होते. या फळांची वर्णने ऐकून या जन्मी नाही तर पुढील जन्मी तरी फळ मिळेलच अशा विचारात माणूस राहतो. अर्थात जन्ममृत्युच्या चक्रात तो अडकत जातो. जसे पक्षी अनेक फळे खातात मात्र चकोर हा असा पक्षी आहे जो अमृताचा हट्ट पकडून बसतो. तसे सांसारिक माणसे सांसारिक वासना धरून बसतात पण एखादाच असा असतो ज्याला केवळ भगवंतच हवा असतो.
ज्ञानी पुरुषास ज्ञान हवे असते, भक्ताला भजन तर साधकाला साधन करणे आवडते. परमार्थी माणसाला परमार्थ, स्वार्थी माणसाला स्वार्थ, जो कंजूस आहे त्याला पैसा आवडतो. योग्यास योग व शरीर रचना, भोगी माणसाला भोग, तर रोग्याला रोग जाणारे औषध आवडते. कवीला काव्य, तार्किक माणसाला तर्क तर श्रद्धाळू माणसाला संवाद आवडतो. विद्वानाला विद्वत्ता, अभ्यासी माणसाला अध्ययन तर कलावंताला कला आवडते. हरीदासाला कीर्तन, स्वच्छतेची आवड असणाऱ्या व्यक्तीला संध्या-स्नान तर कर्मनिष्ठाला कर्मविधी आवडतात. प्रेमळ माणसाला दया-करुणा, चतुराला हुशारी तर शहाण्याला व्यवहार कुशलता आवडते. भक्ताला मूर्तिध्यान, गायकाला ताल ज्ञान, राग आवडणाऱ्या संगीतकाराला ताना, आलाप इ. आवडते. तत्त्वज्ञान अभ्यासकाला तत्त्वज्ञान, नाडी वैद्याला औषध मात्रा, शृंगारप्रिय व्यक्तीला कामशास्त्र, चेटूक करणाऱ्याला चेटूक मंत्र तर जारण-मारण करणाऱ्याला अनेक यंत्रे (कागद वा तांब्याच्या पत्रावर विधीप्रमाणे काढलेली आकृती) आवडतात. टवाळखोराला विनोद, उन्मत्त माणसाला व्यसने, तामसी व्यक्तीला दुष्कर्म आवडते. मुर्ख नादखुळा असतो, निंदक दुसऱ्यांच्या उणीवा शोधतो, पाप्याला पापबुद्धी आवडते. कोणी रसाळ, कोणाला पाल्हाळ तर कोणाला भाबडी भक्ती आवडते. आगम मार्गावर जाणाऱ्याला तंत्र, शूराला लढाई, तर कोणी अनेक धर्म अभ्यासतो. मुक्त होऊ बघणारा मुक्ताच्या लीला बघतो, कोणी सर्वच गोष्टी आवडीने बघतात तर ज्योतिषी पिंगळा पक्षाच्या आवाजावरून भविष्य सांगतो. अशा प्रकारे या जगात अनेक आवडी निवडी असणारी माणसे आवडीनुसार श्रवण व वाचन करत असतात. अर्थात जसे ज्यात गोडीच नाही त्याला गोड म्हणता येणार नाही, ज्याचे नाक सुरेख नाही त्यास सुंदर म्हणता येणार नाही तसे ज्यात परमार्थ मार्ग सांगितला नाही त्यास निरुपण म्हणता येणार नाही.