सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

देव दर्शन (भाग २)

डिजिटल पुणे    07-10-2024 10:09:57

देव दर्शन (भाग २)
 
अवघी सृष्टी जो कर्ता | तो ते सृष्टीहूनि पर्ता | तेथे संशयाची वार्ता | काढूचि नये ||८/१/३४||
 
हे संपूर्ण विश्व ज्याने निर्माण केले तो देव सृष्टीपेक्षा वेगळा आहे, पल्याडचा आहे. या बद्दल बिलकुल संशय धरू नये.
 
दोऱ्या नाचवून विविध कळसूत्री बाहुल्यांचे खेळ दाखवणारा त्या बाहुल्यांपेक्षा वेगळा असतो. तसे हे विश्व निर्माण करणारा एकच आहे तरीही तो विश्वातील पदार्थाहून निराळा आहे. ज्याने हे अनेक जीव निर्माण केले तोच तो जीव कसा असेल ? जे जे कर्म माणसाला करावे लागते ते ते कर्म तो कधीच होऊ शकत नाही. कर्म आणि त्याचा कर्ता भिन्न राहतो. हे समजले नाही तर मन संशयात राहते.
 
देवळाच्या महाद्वारावर एका कारागिराने सुंदर गोपूर निर्माण केले. पण गोपुराचा कर्ता नेहमी त्याच्यापेक्षा वेगळा असतो. जग आणि जगदीश एक आहेत असे अज्ञानाने लोक म्हणतात पण जगदीश नेहमी वेगळाच राहतो. तो सर्वात असून देखील सर्वापेक्षा निराळा आहे. विश्वाचा पसारा त्या देवाने मायेने निर्माण केलेला आहे आणि हे दृश्य खरे आहे हा एक चुकीचा विचार आहे. हे दृश्य मिथ्या आहे. जीवाचे आत्मस्वरूप तेवढे खरे आहे. परमात्मा त्याही पलीकडे असून अंतरात्मा आतबाहेर सर्वात व्याप्त आहे. जीव आणि जगत यांच्या उपाधीमुळे, नावाने एकच सद्वस्तु भिन्न वाटते पण ती तशी नाही. त्या शुद्ध आत्मस्वरुपाला देव म्हणावे. बाकीचे दृश्य विश्व व्यर्थ आहे. हाच वेदान्ताचा सारांश आहे.
 
भगवंत अविनाशी असल्याने तो नाशिवंत दृश्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून देव आला, देव गेला, देव जन्मला, देव मेला असे बोलणे पाप केल्यासारखे आहे. अनेक देव ज्याच्यामुळे अमर होतात त्याला जन्ममृत्युचा स्पर्श नाही. त्याच्या सत्तेने जन्ममरण असते. तो मात्र निराळा आहे. अंत:करण, पंचप्राण, पिंडज्ञान, सर्व तत्त्वे अशाश्वत आहेत. म्हणून त्यांना देव म्हणता येणार नाही. जिथे मानवी कल्पना पुरत नाही त्या स्वरूपास भगवंत म्हणावे.
 
शिष्य समर्थांना विचारतो की कर्तेपणा हे जर कारण असेल तर ते सुद्धा कार्य ठरते. मग हे विश्व कोणी निर्मिले ? द्रष्टा दृश्य पाहतो पण मी द्रष्टा आहे ही जाणीव झाली म्हणजे आपण द्रष्ट्यालाच पाहतो. त्यामुळे द्रष्टा दृश्य बनतो. तो विनासायास दृश्याच्या वर्गात जाऊन बसतो. तसे निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी कर्तेपणामुळे गुण दिसु लागतात. या विश्वाचा कर्ता कोण ? त्याला ओळखावे कसे ? तो सगुण आहे का निर्गुण आहे ? हे मला सांगावे. कोणी म्हणते देवाने संकल्पाने विश्व निर्माण केले. जर हे खरे नसेल तर मग कोणी अजून आहे का ? ही माया कोठून आली ? इ. प्रश्नांची उत्तरे स्वामी पुढील समासी देतात.
 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती