सूक्ष्म आशंका (भाग २)
तरी हे इतुके कोणे केले | किंवा आपणचि जाले | देवेविण उभारले | कोणेपरी ||८/२/१४||
हे विश्व कोणी निर्माण केले ? का आपोआपच झाले ? देवाशिवाय हे विश्व उभारले म्हणावे तर कसे उभारले गेले ?
देवाशिवाय विश्व उभे झाले म्हणावे तर देवाला अस्तित्व राहत नाही. देवाने उभे केले म्हणावे तर त्याला सगुण म्हणावे लागते. मग त्याला निर्गुण कसे म्हणावे ? बरे मग त्याला निर्गुण म्हणावे तर विश्वाचा कर्ता कोण ? कर्तेपणासाठी सगुणता असावी लागते. आणि सगुणता नाशिवंत आहे. देवाला सगुणता दिली तर तो नाशिवंत ठरतो.
स्वतंत्र अशा मायेने हे विश्व निर्माण केले, तिने स्वत:चा विस्तार केला असे म्हणावे तर मग देवाला स्थान राहत नाही. देव निर्गुण व स्वत: सिद्ध आहे त्याचा मायेशी संबंध नाही असे म्हणावे तर ते अद्वैत विचाराच्या विरोधात आहे. एकच एक असलेल्या परब्रह्मात हे अनेकत्व कसे आले ? हा मूळचा प्रश्न आहे. आपल्याकडे तत्त्वज्ञानाची जी परंपरा आहे त्यात सांख्य दर्शनाने हा प्रश्न सोडवण्यासाठी द्वैताचा आश्रय घेतला. त्यांनी निर्गुण पुरुष आणि स्वतंत्र प्रकृती मानली. माया स्वतंत्र मानली तर सांख्यांचे द्वैत स्वीकारावे लागते. मायेकडे कर्तृत्व दिल्याने भक्ताचा उद्धार करणारा असा देव राहत नाही. देवाची सत्ता मायेवर चालते तरच तो माया नष्ट करू शकतो असे नसेल तर अज्ञानी जीवांना मायेपासून कोण सोडवील ? म्हणून माया स्वतंत्र आहे हा विचार योग्य नाही. तिला निर्माण करणारा व नियंत्रित करणारा देव नक्कीच आहे.
मग त्या देवाचा आणि मायेचा नेमका संबंध काय ? यावर आता लक्ष केंद्रित करा असे श्रीसमर्थ सांगत आहेत. यावर लोकांची अनेक मते आहेत. १.कोणी म्हणते माया देवाने त्याच्या इच्छेने केली म्हणून तिचा विस्तार झाला. २.कोणी म्हणते देव निर्गुण असल्याने त्याला इच्छा नसते. म्हणजे माया खोटी आहे. ती कधी जन्माला आलीच नाही. ३.कोणी म्हणतात माया प्रत्यक्ष दिसते. ती देवाची अनादी शक्ती आहे. ४.कोणी म्हणते की माया खरी मानली तर ती ज्ञानाने नाश पावणार नाही. ती ज्ञानाने नाश पावते म्हणून ती खरी भासली तरी खरी नाही. ५.कोणी म्हणते की माया स्वाभाविकपणे खोटीच आहे असे म्हणावे तर माया नष्ट व्हावी म्हणून साधना किंवा भक्ती का करायची ? ६.कोणी म्हणते माया वास्तविक मिथ्या आहे पण जीवाला अज्ञानरुपी ज्वर आला आहे. म्हणून त्याला भय वाटते. साधनारुपी औषधाने मात्र दृश्य मिथ्या आहे असे अनुभवास येते.
ही अनेक मते जरी असली तरी सर्व शास्त्रे आणि विद्वान मायेला मिथ्या असेच म्हणतात. माया खरी नाही असे म्हटले तरी ती नाहीशी झाली असे ऐकायला मिळत नाही. मायेला मिथ्या म्हणण्याआधी तिचे अस्तित्व मान्य करावे लागते. मग ती खरी नाही असे नुसते म्हणतो. तरी ती जीवाला लपेटून असतेच. ज्याला आत्मज्ञान नाही आणि संतांना ओळखू शकत नाही त्याला मायेच्या मिथ्यापणाची जाणीव खरी वाटते. माया खरी नाही हे ज्ञान त्याला खरे वाटते. मायेविषयी ज्याची जी भावना असते त्याला ती तशीच दिसते.