सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

रांगोळी - मांगल्याची सिद्धी, सौंदर्याचा अविष्कार

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    24-10-2024 14:31:42

रांगोळी - मांगल्याची सिद्धी, सौंदर्याचा अविष्कार         
    
लक्ष लक्ष दीप प्रज्वलित करीत जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करणारा दिवाळी मोठा सण. त्याला सणांचा राजा म्हटले आहे, कारण गोरगरीब, श्रीमंत, व्यापारी, कष्टकरी हे सर्वजण भारतभर हा सण उत्साहात साजरा करतात. या सणाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पणत्या ,दिवे  पेटवून केलेली आरास ,फटाक्यांचा धूम धडाका ,उटण्याचा सुगंधी घमघमाट ,चविष्ट फराळ आणि या सर्वांच्या जोडीला घरासमोर अंगणात किंवा दरवाजासमोर , उंबरठ्यावर काढलेली सुंदर  सुबक, आकर्षक 'रांगोळी'.
 
रांगोळीचे मुळात आकृती प्रधान व वल्लरी प्रधान असे दोन मुख्य प्रकार आहेत. आकृती प्रधान रांगोळी भारतात सर्वत्र आढळते. आपल्याकडे   तिला कण्यांची रांगोळी असंही म्हणतात. रांगोळी म्हणजे रंगाची ओळ, रंगाची रेघ, पावित्र्याचे प्रतिबिंब ,मूर्तीमंत श्रद्धेचे प्रतीक अशी रांगोळी शिरगोळ्यांच्या चुरणानेही काढतात. कोकणात भाताची फोलपटे जाळून त्याची पांढरी राख ही रांगोळी म्हणून वापरतात. शहरात किंवा बाजारात जी पांढरी रांगोळी मिळते ती संगमरवराची पूड असते. रांगोळी मुळे घर संस्कार संपन्न व मंगलमय सुशोभित होते. जमीन सारवल्यावर तिच्यावर रांगोळीच्या चार रेघा न विसरता ओढल्या जातात.
 चित्ररूप, चित्रमय रांगोळी हे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य. त्यामध्ये व्यक्तीचित्र, निसर्गदृश्य, प्राणी व वन्य जीवन ताज्या असामाजिक, राजकीय ,अध्यात्मिक घडामोडी इत्यादी विषयावर रांगोळी चित्र काढली जातात व त्यातून वर्तमान काळाची प्रतिबिंब उमटू लागते. या रांगोळ्या बोधप्रद व आशय प्रधान होऊ लागतात व त्यातूनच समाज जागृतीचे महान कार्य घडते. चित्ररूप रांगोळी काढण्यासाठी थोडंफार चित्रकलेचे अंग असण्याची आवश्यकता असते. अशी रांगोळी काढताना गेरूची पार्श्वभूमी ठेवण्याची आवश्यकता नसते.
 
कॅनवास म्हणून साधारण सपाट फरशी किंवा जमीन आवश्यक असते. त्यावर कागद लावून त्या कागदावर जुजवी स्केच काढून मग त्यावर रांगोळी भरली जाते. मुळात रांगोळीचे विविध रंग त्यांच्या उजळ, मध्यम , गडदरंग छटा तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे काम असते. अशा रंग मिश्रणासाठी खास 'लेक कलर्स' वापरले जातात. रंगांचे मिश्रण ही रांगोळीतली सर्वात महत्त्वाची बाब. सफेद रांगोळी ही बेस म्हणून वापरली जाते. रांगोळी साठी हवे असलेल्या रंगाचे मिश्रण आधी बनवून घ्यावे लागते. सफेद रांगोळी बरोबर हे रंग तळव्याने चांगले घासून घ्यायला दोन तास जातात. गडद रंगछटा करण्यासाठी काळा किंवा  पर्शियन ब्लू (निळा) रंग वापरतात. उजळछटांसाठी सफेद रांगोळी अधिक वापरली जाते. काळा रंग हा काजळीचा (व्हेजिटेबल रंग ) असतो. त्याचा वापर जपून करावा लागतो. रांगोळी काढताना साधारण अंगठा किंवा तर्जनी चा वापर केला जातो. या दोन बोटांच्या चिमटीत रांगोळी पकडून टाकली जाते. चित्रांच्या रांगोळी पार्श्वभूमीसाठी चहाच्या गाळणीसारखी गाळण वापरली जाते. रांगोळी सर्वत्र सारखी पडावी तसेच ती वेगाने अधिक भागात टाकता यावी,  यासाठी गाळणीचा उपयोग होतो.
 
डोळे किंवा इतर सूक्ष्म आकारांच्या रांगोळीसाठी मात्र हाताच्या चिमटीत आवश्यक तेवढीच रांगोळी घेऊन बारीक पूड सोडावी लागते. पांढरी रांगोळी कमी व वस्त्रगाळ रंग रांगोळी घेऊन हात आकृती प्रमाणे वळवावा लागतो. चिमूट आणि चाळणी व्यतिरिक्त रांगोळी फेकली जाते. व्यक्ती चित्रातल्या शेड साठी किंवा काही रंग पसरवून टाकण्यासाठी छोटा झटका देऊन रांगोळी गोलाकार पद्धतीने फेकली जाते. अशा प्रकारे रांगोळी फेकल्यावर ती वर्तुळाकार परिघात पसरून पडते. त्यामुळे सलग रंगछटा मिळते. 
 
प्रदर्शनाच्या ठिकाणी रांगोळी काढताना कलाकाराला अक्षरशः घाम गाळावा लागतो.  एक तर रांगोळी काढताना हॉल हवाबंद ठेवावा लागतो. रांगोळीतला दमटपणा व हॉलमधील अंधार नाहीसा करण्यासाठी हॉलमध्ये मोठे बल्ब जळते ठेवावे लागतात. त्यामुळे कलाकारांना घाम येतो,  हा घाम रांगोळीवर पडू नये याची दक्षता घेऊन कमीत कमी तीन ते चार तास कष्ट करून उत्कृष्ट रांगोळी कलाकृती सादर करावी लागते. रांगोळी काढताना एक गोष्ट सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे इथे दुरुस्तीला अजिबात वाव नाही. कुठल्याही प्रकारची दुरुस्ती होऊ शकत नाही. मग एक तर संपूर्ण रांगोळी पुसून पुन्हा नव्याने सुरुवात करणे एवढा मार्ग असतो. रांगोळी पूर्ण झाल्यावर बॉर्डरही महत्त्वाची असते. साधारण चित्राला सफेद रांगोळीची बॉर्डर देण्याची पद्धत आहे,  किंवा चित्राला शोभेशी अशी पूरक रंगाची बॉर्डर देतात.
 काळानुसार आता विविध माध्यमांचा वापर करून रांगोळी प्रकार वाढीस लागले आहेत.
 
विविध धान्यांचा वापर करून रांगोळी रेखाटने, तसेच विविध पाने फुले यांचा रंग, आकार, पोत या गोष्टीचा कल्पकतेने वापर करून आकर्षक रांगोळी काढणे. 'एम्बॉसिंग ', अर्थात उठावाची रांगोळी हा आणखीन एक वेगळा प्रकार रांगोळी उंच सकल पद्धतीने टाकून तिला त्रिमित रूप दिले जाते व ती रांगोळी शिल्पा प्रमाणे भासते. मिठाची रांगोळी तसेच पाण्यावर व पाण्याखालची रांगोळी या प्रकाराकडे आजही अप्रूप म्हणून पाहिले जाते, तसेच हाईटवर प्रकाशमान होणारी रांगोळी हा नवीन प्रकार रांगोळीत यशस्वी होत आहे.
 रांगोळीला आपल्या संस्कृतीत पवित्र अधिष्ठान असले तरी एक कला म्हणून आजही अवघड तंत्रामुळे व अपार मेहनतीचा कलाप्रकार , तसेच आर्थिक समस्या व राजा श्रयाचा अभाव या रांगोळीच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टी,  पण रंगावली कलाकारांची खरी दखल जनतेने घेतली ती रंगवली प्रदर्शने भरविल्यानंतरच किंबहुना रांगोळी कलाकारांनी सादर केलेला हा सामुदायिक प्रयत्न चित्ररूप रांगोळीला प्रगतीपथावर नेण्यास कारणीभूत ठरला, यात शंका नाही.
                      
               - नंदकुमार भार्गव साळवी
                    (९८६९३२२५३९)


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती