मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मदांनाचा बहुप्रतिक्षित छावा हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत रश्मिका मदांना मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात विकी कौशलने जबरदस्त काम केलं आहे, लोकांना त्यांच्या अभिनयाने वेड लावलं आहे. त्यामुळे छावाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. छावा विकी कौशलच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल असा विश्वास विकीच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी विकी कौशलच्या काही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला अॅडव्हान्स बुकिंगद्वारे मागे टाकले आहे. आता छावाच्या बंपर ओपनिंगची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. छावाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर येण्यापूर्वी, अभिनेत्याच्या इतर चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रिपोर्ट्स जाणून घ्या.
विकी कौशलच्या चित्रपटांनी खूप कमाई केली
विकी कौशलच्या चित्रपटांच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या बॅड न्यूज या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.62 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याआधी सॅम बहादूरने 5.75 कोटी, द ग्रेट इंडियन फॅमिलीने 1 कोटी, जरा हटके जरा बचकेने 5.49 कोटी, भूतने 5.10 कोटी, उरी द सर्जिकल स्ट्राइकने 8.20 कोटी, मनमर्जियाने 3.575 कोटी आणि राझीने 3.52 कोटींचा गल्ला जमा केले होते.
ॲडव्हान्स बुकिंगमधून छावाने केली इतकी कमाई
विकी कौशलच्या छावा चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने यापूर्वीच 17.89 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच विकीने त्याच्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. विकी कौशल नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांचा हा चित्रपट चांगली कमाई करणारा ठरणार आहे. छावा चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.
छावा चित्रपटामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. अॅडव्हान्स बुकिंगवरुन तरी हा चित्रपटाला चांगली पसंती दिसून येत आहे. आता येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.