मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता विकी कौशल आहे. अभिनेत्याचा बहुप्रतीक्षित ‘छावा’चित्रपट ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘छावा’चित्रपटाच्या माध्यमातून शिवप्रेमींना रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा पाहायला मिळाली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून अफलातून प्रतिसाद मिळाल्यानंतर खास अभिनेत्याने स्पेशल पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून अफलातून प्रतिसाद मिळाला आहे. ‘छावा’चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहायला मिळत आहे. शंभूराजेंच्या इतिहास असलेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३३.१ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची सध्याची बॉक्स ऑफिस कमाई पाहता चित्रपट येत्या काही दिवसांत कलेक्शनमध्ये इतिहास रचणार असा अंदाज अनेक चित्रपट समीक्षकांनी मांडला आहे. अभिनेत्याने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘छावा’ला मिळणारं भरभरून प्रेम पाहून विकीने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काही तासांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये विकी म्हणतो की, “तुमच्या प्रेमाने ‘छावा’ चित्रपट आज खऱ्या अर्थाने जिवंत झाला. तुम्ही केलेले मेसेजेस, फोन, व्हिडीओ आणि चित्रपट पाहताना तुम्हाला आलेले अनुभव या सगळ्या गोष्टी पाहून मी भारावून गेलो आहे. मी सगळं काही पाहतोय… आणि चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि भरभरुन मिळणारे प्रेम पाहून प्रचंड सुखावलो आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मन:पूर्वक आभार… छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची शौर्यगाथा थिएटरमध्ये जाऊन अनुभवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार… (विश्वास आपका साथ हो, तो युद्ध लगे त्योहार!) जर विश्वास तुमच्यासोबत असेल तर, युद्धही एखाद्या उत्सवासारखे वाटते…”
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा विकी कौशलच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट आहे, ज्याने पहिल्या दिवशी १० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. १३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा पहिल्या सोमवारपर्यंत १०० कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश करण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे प्रदर्शनापूर्वीच १३.७९ कोटी रुपयांचे मोठे अॅडव्हान्स बुकिंग झाले होते. Sacnilk च्या अहवालानुसार, शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी ‘छावा’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३३.१ कोटींचे शानदार निव्वळ कलेक्शन केले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच ‘छावा’च्या शो साठी चांगली गर्दी दिसून आली. हा चित्रपट देशभरातील ३५०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.