रायगड : देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी केली जात आहे. राज्यातील अनेक गड किल्ल्यांवर जाऊन शिवभक्त आज जयंतीदिनी शिवरायांना अभिवादन करत आहेत. तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या रायगड किल्ल्यावरही शिवभक्तांची मोठी गर्दी असून छत्रपती शिवाजी महाराज की जय... या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. त्यातच, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अभिनेता विकी कौशलचा 'छावा' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांचा उंदड प्रतिसाद मिळत आहे.
या सिनेमाने गेल्या 4 दिवसांत 150 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमातील विकी कौशलच्या भूमिकेनं चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणलं असून विकीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. त्यातच, आज शिवजयंतीचे औचित्य साधत विकी कौशलने रायगडावर शिवरायांच्या समाधीस्थळी येऊन त्यांचे दर्शन घेतले. तसेच, छावा सिनेमातील डॉयलॉगही बोलून दाखवला.
छावा चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशलने आज शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. मला पहिल्यांदा किल्ले रायगडावर येण्याचा योग आला, सगळ्यांना माझे धन्यवाद. माझं नशीब, माझं सौभाग्य आहे की, मला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेता आलं. आजचा दिवस माझासाठी सर्व काही आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आहे, असे विकीने म्हटले. तसेच, छावा सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादबद्दलही त्याने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी, विकी कौशलसोबत फोटो काढण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
छावा सिनेमातील डायलॉग
किल्ले रायगडावर येऊन कस वाटलं, असा प्रश्न अभिनेता विकी कौशलला विचारण्यात आला होता. त्यावर, आज DIVINE फिलिंगसारखं मला वाटत आहे, रायगडावर येऊन आज सर्वसंतुष्ट वाटलं, असेही विकीने म्हटले. शेर नही रहा लेकीन छावा अभी भी जंगल मे घूम रहा है, हम शोर नहीं करते सीधा शिकार करते है .. असं म्हणत त्यांनी चित्रपटातील डायलॉग देखील पत्रकारांच्या आग्रहास्तव मारुन दाखवला.
शिवाजी महाराज हे रयतेचे राजे
दरम्यान, संभाजी महाराज यांचं जीवन साकारण्याची संधी मला मिळाली. शिवाजी महाराज यांची भूमिका ही आयुष्यभर आठवणीत राहणारी आहे. कारण, ते रयतेचे राजे होते. त्यांनी आपलं बलिदान संपूर्ण रयतेसाठी दिले, त्यांची प्रेरणा अजूनही आपल्याला मिळत असल्याचं विकी कौशलने माध्यमांशी बोलताना म्हटले. “मी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारावी हे माझं भाग्य आहे. लोकांचं प्रेम पाहून खूप चांगलं वाटत आहे. आज जे आहे ते सगळं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आहे. त्यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा,” असेही विकी कौशल यावेळी बोलताना म्हणाला