मुंबई : आठवड्याभरातच २०० कोटींचा टप्पा अभिनेता विक्की कौशलच्या ‘छावा’चित्रपटाने पार केला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल- रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत असलेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ चित्रपटाची सोशल मीडियासह सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटी आणि समीक्षकांकडून चित्रपटाचं कौतुक होत असताना अभिनेत्री जिनिलिया डिसुझाने चित्रपटासाठी खास भावूक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या पोस्टची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
आलिया भट्ट, करण जोहर, आयुष्मान खुराना, राजकुमार रावसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूड सेलिब्रिटीही विकी कौशलच्या चित्रपटाचं कौतुक करत असताना, आता बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुखने ‘छावा’ चित्रपटासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री भावुक झालेली पाहायला मिळाली. यावेळी तिने विकी कौशलसाठी खास पोस्ट इन्स्टा स्टोरीला शेअर केली आहे. यावेळी अभिनेत्रीने विकी कौशलच्या मेहनतीचं आणि अभिनयाचं भरभरुन कौतुक केलं.
जिनियीला लिहिते, “प्रेक्षकांसाठी असे काही कलाकार असतात ज्यांच्याकडून नेहमी आपल्याला सकारात्मक अपेक्षा असते की, हे काहीतरी चांगलंच करणार, विकी कौशल माझ्यासाठी तसा अभिनेता आहे. त्याची मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा खूप काही सांगून जातो. ऑनस्क्रीनवर विकी ज्याप्रकारे भूमिका साकारतो, यात त्याने घेतलेली मेहनत दिसून येते. खूप अभिनंदन विकी कौशल, रश्मिका मंदाना, मॅडडॉक फिल्म्स, लक्ष्मण उतेकर, अक्षय खन्ना आणि या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन! तुम्हाला सर्वांना खूप खूप प्रेम”
जिनिलीया देशमुखची पोस्ट विकी कौशलने स्वत:च्या अकाऊंटवर रिशेअर करत लिहिले की, “जिनिलीया तू लिहिलेल्या अभिप्रायासाठी तुझे खूप खूप आभार” असं म्हटलं आहे. दरम्यान, ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्याचं गेल्या सात दिवसांमध्ये पाहायला मिळालं आहे. चित्रपटाचं एकूण कलेक्शन २१९.२५ कोटींच्या घरात जाऊन पोहोचलं आहे. आता येत्या काळात ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर आणखी कोणकोणते नवीन रेकॉर्ड्स मोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.