सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुणे दौर्यावर
 पूर्ण तपशील

छावा चित्रपटाचे कोल्हापूर कनेक्शन

अजिंक्य स्वामी    22-02-2025 12:37:57

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द या लहानशा गावातून सुरू झालेला प्रवास थेट बॉलिवूडच्या चमकत्या दुनियेत पोहोचला आहे. दिलीप गणपती रोकडे या तरुणाने आपल्या कलेच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. छावा या ऐतिहासिक चित्रपटाच्या यशस्वी प्रवासात त्याच्या कला दिग्दर्शनाचा मोठा वाटा आहे.

भूमिहीन शेतमजूर कुटुंबात जन्मलेला दिलीप हा लहानपणापासूनच चित्रकलेच्या आवडीमुळे वेगळा ठरला. न्यू हायस्कूल, कसबा तारळे येथे शिक्षण घेत असताना विविध कार्यक्रमांतून त्याने आपली कला सिद्ध केली. कोल्हापूरच्या कला निकेतनमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण घेत असताना त्याने अनेक छोटे-मोठे उद्योग केले. मात्र, जिद्दीच्या जोरावर त्याने डिझायनिंगची पदवी मिळवली आणि २०१२ मध्ये संजय लीला भन्साळी ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळवली.

रावडी राठोड पासून सुरू झालेला त्याचा प्रवास छावा पर्यंत थक्क करणारा आहे. रामलीला, तनु वेड्स मनु २, पद्मावत, सुपर ३०, फँटम, महाराज, तेजस आणि भूतनाथ २ यांसारख्या चित्रपटांच्या कला दिग्दर्शनात त्याने आपला ठसा उमटवला आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक वासिक खान यांच्या मार्गदर्शनामुळे त्याला बॉलिवूडच्या मोठ्या बॅनरसोबत काम करण्याची संधी मिळाली.

मुंबईत स्थायिक झाल्यानंतरही दिलीपची नाळ आपल्या मातीशी कायम जोडलेली आहे. त्याच्या साधेपणामुळे गावकऱ्यांमध्ये तो विशेष प्रिय आहे. गावातील सर्वांशी सहज मिळून मिसळणारा दिलीप बॉलिवूडच्या चकचकीत दुनियेतही नम्र राहिला आहे. त्याने विवाहासाठीही गावाकडील सर्वसामान्य कुटुंबातील स्वराची निवड केली, यावरून त्याचे मातीशी असलेले नाते स्पष्ट होते.

दिलीपचे वडील गणपती रोकडे यांनी आपल्या मुलाच्या यशाने भारावून जाऊन सांगितले की, "चित्रपटाच्या श्रेयनामावलीत कला दिग्दर्शक दिलीप गणपती रोकडे असे पाहिले की, जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते." मात्र, या यशाचे साक्षीदार होण्यासाठी दिलीपची आई शांताबाई हयात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.तारळे खुर्दचा हा सुपुत्र बॉलिवूडमध्ये आपल्या मेहनतीने चमकत आहे आणि त्याचा हा प्रवास अनेक नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती