सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

पती सत्यवानासाठी सावित्रीने केलं वटसावित्रीचं व्रत; जाणून घ्या वटपौर्णिमेची पारंपरिक कथा आणि महत्त्व

डिजिटल पुणे    21-06-2024 12:10:47

पती सत्यवानासाठी सावित्रीने केलं वटसावित्रीचं व्रत; जाणून घ्या वटपौर्णिमेची पारंपरिक कथा आणि महत्त्व

वटसावित्री या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण, आपल्यापैकी अजूनही असे बरेच जण आहेत ज्यांना या दिवलाचं पारंपरिक महत्त्व आणि त्यामागची कथा नेमकी काय आहे हे माहीतच नाही. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

वटसावित्रीच्या व्रताची पारंपरिक कथा 

 खरंतर वटसावित्री या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. या राजाला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

वडिलांच्या म्हणण्यानुसार, सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी आणि मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

...म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत पूर्ण केले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला ग्लानी आली आणि तो जमिनीवर पडला. त्यावेळी यमधर्म तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्यामागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले आणि पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे आणि राज्य परत मागितले आणि आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात असं पौराणिक कथेत म्हटलंय.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती