सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

द्वैतकल्पना निरसन (भाग २)

डिजिटल पुणे    08-07-2024 10:33:44

द्वैतकल्पना निरसन (भाग २)

कल्पना जन्माचे मूळ | कल्पना भक्तीचे फळ | कल्पना तेचि केवळ | मोक्षदाती ||७/५/२४||

आपल्या जन्माचे मूळ कारण कल्पना आहे, भक्ती आयुष्यात प्रगट होते तीही कल्पनेमुळे, शेवटी अज्ञानातून मुक्ती देते तीही कल्पनाच.

कल्पना करणे हा मनाचा स्वभाव आहे. मग त्याचाच आधार घेऊन वाटचाल सुरु करावी. कल्पना बंधनात टाकते आणि मुक्तही करते. गती आणि अधोगती कल्पनेवरच अवलंबून आहे. संसारात भव्य आणि सृजनशील कल्पनाच सांसारिक यश देतात. कल्पनातीत जाण्यासाठीही कल्पनाच करावी लागते. दु:खी कल्पना अधिक दु:खात टाकते. म्हणून शुद्ध कल्पना करत राहावी.

श्रीसमर्थ सांगतात की परमार्थात जर ही कल्पना गुंतविली तर समाधान प्राप्त करून देते. नाहीतर अध:पात करते. या विश्वरचनेचे मूळ कल्पनेतच आहे. ती मुळासकट उपटून टाकली तर ब्रह्मप्राप्ती सहज आहे. श्रवण, मनन, निदिध्यास या मार्गाने दृश्यात अडकलेली खोटी कल्पना नष्ट पावते आणि आत्मसाक्षात्कार होतो. ब्रह्मज्ञानाने स्वस्वरूप भान आले, प्रज्ञा स्थिर झाली की खोटी-शबल-अशुद्ध कल्पना पराभूत होते.

सूर्याच्या प्रकाशापुढे अंधार जसा मिटतो तसे स्वरूपापुढे खोटी कल्पना टिकत नाही. कल्पना नष्ट होताच द्वैताचे भान व चिंतन आपोआप नाहीसे होते. जसे जनावराचा उपयोग करून जनावर पकडावे किंवा आकाशातून येणारा बाण बाणानेच तोडावा तसेच कल्पनेनेच कल्पना नाहीशी करावी. कल्पना शुद्ध करत राहावी ज्यायोगे तिच्यात एवढे सामर्थ्य निर्माण होते की त्याने शबल किंवा अशुद्ध कल्पना नाहीशी होते. कल्पना शुद्ध झाल्याची खुण काय तर ती निर्गुणात स्थिर राहते. अनुसंधान अखंड राहते. द्वैताचे विस्मरण, स्वस्वरूपाचे स्मरण आणि अद्वैताचे ज्ञान या तीन गोष्टी शुद्ध कल्पनेमुळेच होतात.

जी अद्वैतात रमते ती शुद्ध कल्पना आहे तर जी द्वैतात रमते ती अशुद्ध कल्पना समजावी. एकच एक ब्रह्म सत्य आहे असा निश्चय होणे हा शुद्ध कल्पनेचा भावार्थ आहे. अशुद्ध कल्पना एकदा का नाहीशी झाली की शुद्ध कल्पना तेवढी शिल्लक राहते. शुद्ध कल्पना ज्याची कल्पना करते ते आपले स्वस्वरूप होय. स्वस्वरूपाचे अनुसंधान ही शुद्ध कल्पनेची खुण आहे. त्यात कल्पना करणारा स्वरूपाशी लीन होऊन जातो. एकदा का आत्मसाक्षात्कार झाला की आत्मस्वरुपाखेरीज इतर सत्य नाही असा निश्चय होतो. सूर्य अस्ताला जाऊ लागला की जसे अंधार दाटून येतो तसे आत्मज्ञान मलीन झाले की अज्ञानाचा जोर वाढतो. म्हणून अखंड श्रवण करत जावे. शेवटी सार एवढे आहे की कल्पनारूप मनाला हे द्वैतमय दृश्य अनुभवास येते ते मन तुझे खरे स्वरूप मुळीच नाही. त्या पलीकडे तू आहेस.

संशोधक, लेखक, कथाव्यास - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती