सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

साधनप्रतिष्ठा (भाग ३)

डिजिटल पुणे    12-08-2024 11:08:49

साधनप्रतिष्ठा (भाग ३)

आणीक येक समाधान | मीपणेविण साधन | करू जाणे तोचि धन्य | समाधानी ||७/७/५३||

समाधानाचे एक रहस्य आहे की साधना चालू असते पण त्यात मीपणाचा लेश नसतो. ज्याला ही युक्ती जमली त्याचे समाधान काही विलक्षण समजावे.

श्रीसमर्थ सांगत आहेत की देहबुद्धी किंवा मीपणा त्यामुळे दृश्य खरे वाटायला लागते आणि ब्रह्म खोटे वाटायला लागते. मन संशयात अडकते. मनाच्या सर्व कल्पना म्हणजे ब्रह्मस्वरूप नव्हे. म्हणून हा मीपणाचा मार्ग समूळ नष्ट करावा. तेव्हाच ब्रह्माशी तदाकार होता येते. संतांच्या संगतीत ही संदेह वृत्ती समूळ नष्ट करून टाकावी. हा मीपणा शस्त्राने तुटत नाही, दगडासारखे याला फोडता येत नाही, सोडायला जावे तर सुटता सुटत नाही. या मीपणाचा भयंकर परिणाम म्हणजे भक्ती नाहीशी होते. वैराग्य शक्ती गळून जाते. संसाराकडून असलेली शाश्वत सुखाची अपेक्षा पूर्णत: भंग पावणे म्हणजे वैराग्य भाव. आणि ईश्वरीय अनंत प्रेमाशी, स्वरूपाशी एकाकार होणे म्हणजे भक्ती. या दोहींचा नाश या मीपणामुळे होते. या मीपणामुळे संसाराचाही नाश होतो. अभिमान आल्यामुळे परमार्थ तर बुडतोच पण प्रपंच देखील घडत नाही. यश, कीर्ति आणि पराक्रम सर्व याने नष्ट होते.

मीपणामुळे मैत्री तुटते, प्रेम आटते, माणसामाणसातील ऐक्य नष्ट होते. अभिमान, संशय येऊन भांडणे होतात. असा मीपणा कोणालाच सहन होत नाही मग भगवंताला तरी तो कसा सहन होईल बरे ? म्हणून मीपणा ज्याने सोडला तोच खरा समाधानी होतो. मग हा मीपणा सोडावा तरी कसा ? ब्रह्माचा अनुभव घ्यावा तरी कसा ? समाधान कोणत्या प्रकारे मिळेल ? यांची उत्तरे श्रीसमर्थ देतात की मीपणाचा स्वभाव समजून घेऊन त्याचा त्याग करावा. ब्रह्माशी तदाकार व्हावे आणि त्याचा अनुभव घ्यावा. नि:संग होऊन म्हणजे दृश्य गोष्टींमध्ये आसक्त न होता समाधान प्राप्त करावे. ज्याच्या विवेकाचा विकास झाला तोच मीपणा, अहंकार सोडू शकतो. मी साधना करतो हा अहंकार देखील ज्याच्यातून गेला आहे तोच समाधानी होऊ शकतो. जसजसा चित्ताचा विकास होत जातो आणि देहबुद्धी निरर्थक वाटू लागते तसतसा अहंकार क्षीण होत जातो. कर्ता करविता तो आहे ही बुद्धी स्थिर होणे आवश्यक असते.

समजा एखादा ब्रह्माकार झाला आणि म्हणू लागला की मला साधनेची गरज काय तर समजावे की तो परत कल्पनेच्या प्रांतात येऊन पडला. तदाकार झालेला साधक कल्पनातीत झालेला असतो. मग मला अनुभव आला असे कोण म्हणणार. साक्षी सिद्ध झाल्यावर कल्पना जरी समोर आली तरी ज्याची सम्यक स्थिती ढळत नाही, नेमकी कल्पना कशी उगवते याचा अनुभव ज्याला आला आणि ज्याने कल्पनेला नष्ट केले त्यालाच खरा साधू म्हणावे. निर्विकल्पाची कल्पना करतानाही ती मी करत आहे अशी भावना तेथे असू नये.

ब्रह्मविद्येमध्ये ज्ञाता ज्ञेयाशी तदाकार होऊन जातो आणि परत वेगळेपणाने प्रगट होतो. म्हणजे बाहेरून दिसायला तर आपण मीपणाने असावे पण खऱ्या अर्थाने ते संपूर्ण नसावे. अंतरंगी तदाकार असावे. द्वैताचे दोन तट आहेत पण मधून अद्वैताची गंगा वाहते आहे अशी स्थिती सिद्धाची असते. जो असा दक्ष आणि समाधानी झाला त्यालाच हे कळू शकते.

कथाव्यास (श्रीमद्भगवद्गीता, श्रीराम, श्रीहनुमान कथा) - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती