सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

श्रवण निरुपण (भाग ३)

डिजिटल पुणे    02-09-2024 11:36:07

श्रवण निरुपण (भाग ३)

आता श्रवण कैसे करावे | तेहि सांगिजेल अघवे | श्रोता सावधान द्यावे | येकचित्ते ||७/९/१/||

श्रवण कसे करावे ते नीट सांगतो. म्हणून श्रोत्यांनी एक चित्ताने सावध होऊन ऐकावे.

श्रीसमर्थ सांगतात की ज्याने आपले समाधान भंग पावते असे भ्रमात्मक, हानिकारक वक्तृत्व ऐकू नये. बऱ्याचदा असे होते की एक ग्रंथ वाचल्यावर मनाचा निश्चय होतो पण दुसरा ग्रंथ वाचला की तो निश्चय नष्ट होऊन जातो. अशाप्रकारे मन नेहमी संशयात राहते. म्हणून ज्या ग्रंथांने मनाचे संशय नष्ट होतात असे अद्वैत वेदांत सिद्ध करणारे परमार्थ ग्रंथ नेहमी श्रवण करावे.

जो मोक्षाचा अधिकारी आहे, तळमळ लागलेला आहे तो परमार्थ मार्गावरून चालतो. त्याला अद्वैत विचार व्यक्त करणारे ग्रंथ नेहमी आवडतात. या इहलोकाविषयी ज्याची आसक्ती सुटली आहे, परलोकीचा साधक झालेला आहे त्याने शास्त्रातील आत्मनात्मविवेकाचा अभ्यास करावा. अद्वैतवादि साधकाला द्वैतवादी विचार आवडत नाहीत.

आवडीसारखे मिळे | तेणे सुखचि उचंबळे | नाही तरी कंटाळे | मानस ऐकता ||७/९/९||

आवडीसारखे मिळाले तर सुख वाटते नाहीतर मनाला कंटाळा येतो. ज्या देवतेची जो उपासना करतो त्याला त्या देवतेविषयी प्रीति वाटते. मग इतर देवतेचे वर्णन त्याला नकोसे वाटते. प्रयत्न न करता जी आपोआप मनात दाटून येते तीच खरी प्रीति होय. आत्मज्ञानी साधकाला आत्मनात्मविवेक सोडून दुसरे विषय आवडत नाहीत. ज्या कुळात देवी उपासना चालत आलेली आहे तिथे सप्तशती ग्रंथच पाहिजे, दुसरे कामाचे नाही. ज्याने अनंताचे सकाम व्रत घेतले आहे त्याला निष्काम करणारी भगवद्गीता सांगून चालत नाही. हातात घालायचे वीर कंकण नथ म्हणून घालता येत नाही. जिथे ज्या वस्तूचे स्थान आहे तिथेच ती शोभून दिसते. अनेक तीर्थे असली तरी ज्या तीर्थाचे महात्म्य त्याच तीर्थात वाचायला हवे. मल्हारी महात्म्य द्वारकेत, द्वारका महात्म्य काशीत आणि काशी महात्म्य तिरुपतीला व्यंकटेशापाशी नेऊन चालणार नाही.

मुद्दा हा आहे की ज्याला अद्वैत ग्रंथ आवडतात तो तेच वाचतो. दुसरे त्यास आवडत नाहीत. योग्यासमोर भुताटकी, रत्नपारख्यासमोर दगड, विद्वान माणसासमोर तमाशा शोभणार नाही. वैदिक कर्म करणाऱ्यासमोर कर्मसंन्यासी, निस्पृहासमोर कर्माच्या फळांचे महात्म्य, ज्ञानी पुरुषासमोर कामशास्त्र शोभणार नाही. ब्रह्मचाऱ्यासमोर कलावंतीणीचा नाच, ब्रह्म वर्णनात रासक्रीडा किंवा राजहंसासमोर केवळ पाणी ठेऊन ते शोभणार नाही. तसे आत्मनिष्ठ पुरुषासमोर शृंगार रसाची पोथी ठेवली तर त्याला समाधान मिळणार नाही. एखादा भिकारी क्षुद्र वस्तूकडे आकर्षित होईलही पण राजासमोर त्याचा उपयोग नाही. अमृतासमोर ताकाचे महत्व ते काय किंवा सन्याशाला उष्ट्या चांडाळीचे व्रत (दोन जेवणामधील काळात तोंडात भाकरीचा तुकडा सतत ठेवायचा आणि त्या हलक्या देवतेचा मंत्र जपायचा.) घ्यायला लावणे शोभत नाही. वेदनिष्ठ कार्मानुष्ठान करणाऱ्याला वशीकरण प्रयोग सांगितला किंवा जारणमारणउच्चाटन इ. हीन मंत्राच्या नादी लागणाऱ्या पंचाक्षऱ्याला पारमार्थिक निरुपण सांगितले तर त्याला त्याचा कंटाळा येणार. त्याचप्रमाणे पारमार्थिक आवड असणाऱ्या साधकाला आत्मज्ञान आवडते. इतर ग्रंथ त्यास आवडणार नाहीत.

कथाव्यास (श्रीमद्भगवद्गीता, श्रीराम, श्रीहनुमान कथा) - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती