सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

रशियातील सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधानमंडळादरम्यान सामंजस्य करार

डिजिटल पुणे    07-06-2024 10:38:06

सेंट पिटर्सबर्ग, रशिया  : महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ५ ते ९ जून, २०२४ दरम्यान सेंट पिटर्सबर्ग च्या अभ्यास दौऱ्यावर असून ६ जून रोजी दोन्ही विधानमंडळांमधील सामंजस्य करारावर  स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा सामंजस्य करार भारत-रशिया मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने तसेच मुंबई-सेंट पिटर्सबर्ग सिस्टर सिटीजच्या वाटचालीतील मानाचा तुरा ठरणार असल्याची भावना यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि अभ्यासदौरा शिष्टमंडळाचे नेते ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे विविध उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

या सामंजस्य करारावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झँडर बेलस्की यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  अंबादास दानवे,  विधानसभा सदस्य अमिन पटेल आणि श्रीमती गिता जैन, विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह मुंबईतील रशिया हाऊसच्या संचालक श्रीमती एलिना रेमेझोव्हा, सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे सन्माननीय सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानमंडळाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोककल्याणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करणारे कायदे, सखोल विचारमंथन आणि वाद-प्रतिवाद-सुसंवाद ही संसदीय लोकशाहीला अभिप्रेत असलेली सभागृहातील चर्चेची परंपरा याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही विधानमंडळांमध्ये वैचारिक आदान-प्रदान, दोन्हीकडील सदस्यांच्या अभ्यासभेटी, संगीत-कला-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यक्रमांचे आयोजन या सामंजस्य करारामुळे आता अधिक चांगल्याप्रकारे करता येऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला.

विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी बोलताना रशियाने एक सच्चा मित्र या नात्याने आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताच्या भूमिकेला नेहमीच बळ दिल्याचे सांगितले. सुमारे ५५५ वर्षांपूर्वी भारत भेटीवर आलेले रशियन व्यापारी अफानासी निकीतीन यांचे अलिबाग जवळील रेवदंडा येथे उभारण्यात आलेले स्मारक तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा मॉस्कोतील रुदोमिनो राष्ट्रीय ग्रंथालयात समारंभपूर्वक बसविण्यात आलेला पुतळा आणि आता आजचा हा सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभ यामुळे हे मैत्रीसंबंध वेगळ्या उंचीवर पोहचले असल्याचे त्या म्हणाल्या. मराठीतील उत्तम साहित्य रशियन भाषेत अनुवादित करणाऱ्या मराठी भाषा प्रेमी आणि तज्ज्ञ डॉ. नीना क्रस्नादेम्बस्काया यांचा डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आवर्जून गौरव केला. महिला सशक्तीकरण, अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम या बाबींना सामंजस्य करारामुळे निर्माण झालेल्या संयुक्त मंचाद्वारे प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झँडर बेलस्की यांनी सप्टेंबर, २०२३ मध्ये आपल्या मुंबई भेटीतील आठवणींना उजाळा दिला आणि सामंजस्य करारातील मुद्यानुसार यापुढील काळात परस्पर सर्वक्षेत्रीय संबंध आणखी दृढ होतील, अशी ग्वाही दिली.

सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरमला उपस्थिती

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ आणि ७ जून रोजी सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरम – २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या अत्यंत महत्वाच्या परिषदेसाठी देखील या शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे हे फोरमच्या  व्यासपीठावर आपले विचार मांडणार आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती