मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या निधनाने राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, न्यायिक क्षेत्रातील दिग्गज, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना दांडगा राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक अनुभव होता. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. या पदांवरून काम करताना त्यांनी नेहमीच लोकहीत जपण्याचा प्रयत्न केला आहे. पायाभूत सुविधांचा विकास, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुधारणा आदी बाबतीतील त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाचे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना करतो. एस.एम. कृष्णा यांचे कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते, चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.