ठाणे : कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल आजमेरा सोसायटीत मराठी कुटुंबीयांना केलेल्या मारहाण आणि हल्ला प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (20 डिसेंबर) सकाळी दोघांना ताब्यात घेतलं आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला यानं शुक्रवारी सोशल मीडियावर आपला व्हिडिओ पोस्ट करत स्वत:ची भूमिका मांडली होती. यानंतर पोलिसांनी शुक्ला यांना टिटवाळा-शहाड भागातून ताब्यात घेतलं, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
दुसरीकडे या प्रकरणात गुन्हा दाखल करताना हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची साहाय्यक पोलीस आयुक्त चौकशी करत आहेत. या प्रकरणात ते दोषी आढळून आले, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असं उपायुक्त झेंडे यांनी सांगितलं. सुमित जाधव (वय- 23 वर्ष ), रंगा उर्फ दर्शन बोराडे (वय- 22 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
"अभिजित देशमुख यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल दहा जणांपैकी दोघांना पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे. या दोघांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीचे आणि आताचा गुन्हा यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांची चार विशेष पथकं उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेत आहेत," असं उपायुक्त झेंडे यांनी सांगितलं. "या गुन्ह्याचं स्वरूप आणि तपासात पुढे येणारी माहिती या अनुषंगानं गुन्ह्याची नवीन कलमं या प्रकरणात नोंदवली जाणार आहेत," असं देखील उपायुक्त झेंडे यांनी सांगितलं.
या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आजमेरा संकुल, योगीधाम व्यापारी संघटना, परिसरातील नागरिक, मनसे, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, माय मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी उपायुक्त झेंडे यांच्याकडे केली आहे. या गुन्ह्यातील सहभागींंवर कलम 109 अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे (उबाठा) आंदोलन केलं जाईल, असा इशारा शिवसेना पक्षाचे (उबाठा) उपनेते विजय साळवी यांनी पोलिसांना दिला आहे. "कल्याण शहर सर्व समाज, धर्मियांना एकत्र घेऊन चालणारं शहर आहे. मराठीचा अवमान येथे खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणाचं राजकारण न करता या कठोर शिक्षा होईल यादृष्टीनं पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोई यांनी केली आहे.