ठाणे : शिंदेंच्या शिवसेनेतील आमदाराच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरमधील एका समारंभात आमदाराची हत्येचा कट रचला होता. पण, आमदारानं याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच, शिवसेनेतील दोन जणांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून बालाजी किणीकर हे चौथ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट आहेत. याच गटबाजीतून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वत: आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मा,त्र याबाबत अद्याप आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तर या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.