मुंबई : नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यास, त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
संबंधित व्यावसायिक हे महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणे व शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएसपी) उत्तीर्ण केला असणे आवश्यक आहे.
किरकोळ व घाऊक औषध विक्रेते हे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) पूर्ण करणाऱ्या होमियोपॅथी नोंदणीकृत डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधांची विक्री करू शकतात. तसेच, किरकोळ औषध विक्रेते हे डॉक्टरांद्वारे देण्यात आलेले प्रिस्क्रीप्शनवर औषध विक्री करू शकतात.
तथापि महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायिक यांच्या प्रिस्क्रीप्शनवर औषधांची विक्री करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन क्रमांक व सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) ही अर्हता प्राप्त केल्याबाबतचा सर्टिफिकेट क्रमांक नमूद असल्याबाबत खात्री करूनच औषधांची विक्री करावी. ही जबाबदारी किरकोळ औषध विक्रेते यांची राहील. असेही आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री. नार्वेकर यांनी कळविले आहे.